पिंपरीतील खराळवाडीत तरुणीची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

0
636

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – ‘मी आत्महत्या करीत आहे, मला शोधू नका’ अशी सुसाईड नोट लिहून एका तरुणीने इमारतीच्या तीसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.२०) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास खराळआई उद्यानाजवळ वैष्णवी पार्क ए जे चेंबर्स या इमारतीत घडली.

वर्षा शंकर जगताप (वय १९, रा. एच ए कॉलनी, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास खराळवाडी मधील खराळआई उद्यानाजवळ वैष्णवी पार्क ए जे चेंबर्स या इमारतीच्या डक्टमध्ये काहीतरी पडल्याचा जोरदार आवाज आला. यावर नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता डक्टमध्ये वर्षाने उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले. नागरिकांनी तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वर्षाला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले.

तपासादरम्यान पोलिसांना तिच्या खोलीमध्ये एक सुसाईड नोट मिळून आली आहे. ‘मी आत्महत्या करीत आहे, मला शोधू नका’ असे त्या चिठ्ठीमध्ये नमूद करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र एच ए कॉलनीत राहणाऱ्या वर्षाने खराळवाडीतील वैष्णवी पार्क ए जे चेंबर्स या इमारतीवरुनच उडी मारुन आत्महत्या का केली, हा प्रश्न उपस्थित होत आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.