Pimpri

पिंपरीतील कामगारनगर येथे दुकानात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी एकाच कुटुंबातील चौघांवर केले कोयत्याने वार

By PCB Author

February 13, 2019

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – दुकानात जबरदस्ती घुसून तीन अज्ञात हल्लेखोरांनी दुकानाचे शटर बंद केले. त्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कोयत्याने वार केले. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. ११) रात्री पावणेनऊच्या सुमारास पिंपरीतील कामगारनगर येथील अमित ट्रेडर्स या दुकानात घडली.

याप्रकरणी विजय अवतराम लाडकाणी (वय ५५, रा. रॉयल वर्ल्ड शाळेजवळ, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय यांचे कामगारनगर पिंपरी येथे अमित ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास फिर्यादी विजय त्यांचे भाऊ घनश्याम अवतराम लाडकाणी, सुनील जयदेव लाडकाणी आणि मुलगा मनीष विजय लाडकाणी हे चौघे दुकानात होते. त्यावेळी अज्ञात तीन हल्लेखोर त्यांच्या दुकानात जबरदस्ती घुसले. त्यांनी दुकानाचे शटर बंद केले आणि फिर्यादी विजय यांच्या हाताच्या दंडावर, डोक्यावर, घनश्याम यांच्या डाव्या मांडीवर सुनील यांच्या हाताच्या पंज्यावर आणि मनीष याच्या डोक्यात मागच्या बाजूने कोयत्याने वार केले. याप्रकरणी तीन अज्ञात हल्लेखोरांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक हरीदास बोचरे तपास करत आहेत.