पिंपरीतील ओमिशा चिट फंड कंपनीवर फसवणूकीचा गुन्हा

0
1256

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – ज्यादा पैशांचे आमिष दाखवून पिंपरीतील ओमिशा चिट फंड कंपनीच्या संचालक आणि चेअरमने एका ग्राहकाची तब्बल ८ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०१२ ते २०१५ दरम्यान झाला असून कंपनीच्या संचालक आणि चेअरमन सहीत सहा जणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामचंद्र बाळु चांदारे (वय ४६, रा. जनवाडी, मॅफको कंपनी जवळ, पुणे) असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात ओमिशा चिट फंड कंपनीचे संचालक मानसिंग शंकर घोरपडे (वय ४०, रा. ऐश्र्वर्यम को.ऑपरेटीव हौसिंग सोसायटी चिंचवड, मु.रा. विटा, सांगली), कैलास परब (वय ५५, रा. कुमार प्रेसिडेन्सी, कोरेगाव पार्क), सुशिलकुमार सुमतीलाल संघवी (वय ४३, रा. संघवी निवास, निगडी), विकास मुक्ताजी नाणेकर (वय ४५, धृव अर्पाटमेंट, प्राधिकरण, निगडी), दत्तात्रय महादेव टकले (वय ५९, रा. सेक्टर २६, आदित्य बंगला, निगडी) आणि चेअरमन योगेश भोसले (वय ३०, रा. विटा, खानापुर, सांगली) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१२ ते २०१५ दरम्यान फिर्यादी रामचंद्र चांदारे यांना पिंपरीतील ओमिशा चिट फंड कंपनीच्या संचालक मंडळ आणि चेअरमन यांनी जादा पैशांचे आमिष दाखवून हप्त्याने हप्त्याने तब्बल ७ लाख पाच हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र बरेच वर्ष उलटून देखील चांदारे यांना लाभांसह ८ लाख २५ हजार रुपये परत देण्यात आले नाही. चांदारे यांनी वेळोवेळी पाठ पुरवा करुन देखील त्यांना लाभांसह पैसे परत देण्यात आले नाही. यामुळे चांदारे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात ओमिशा चिट फंड कंपनीचे संचालक मंडळ आणि चेअरमन विरोधात असे एकूण सहा जणांविरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी या सर्वांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.