Pimpri

पिंपरीतील एचए मैदानावर सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला; बलात्काराची शक्यता, आरोपी सीसीटीव्हीत कैद

By PCB Author

September 27, 2018

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – नेहरुनगर येथील एच.ए मैदानात आज (गुरुवार) सकाळी अकराच्या सुमारास म्हसोबा मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या झुडपात एका सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडली. मृत मुलीची ओळख पटली असून एक नराधम तिला तिच्या घराजवळून घेऊन जात असताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिस नराधम आरोपीचा शोध घेत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त सतिश पाटील, पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी केली. पंचनाम्यानंतर मुलीवर बलात्कार झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवीला आहे. मुलीचा मृतदेह पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, सोमवारी (दि.२४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पिंपरीतील पत्राशेड येथे राहणारी सात वर्षीय चिमुकली बेपत्ता झाली होती. आज एच.ए मैदानात सापडलेला मृतदेह हा तिचाच असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या चिमुकलीला एक नराधम तिला तिच्या घरापासून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस नराधम आरोपीचा शोध घेत आहेत.