पिंपरीच्या महापौरपदी मूळ ओबीसीची निवड न केल्यास परिणाम भोगा; ओबीसी संघटनांचा भाजपला गर्भित इशारा

0
1111

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव आहे. त्यामुळे महापौरपदी मूळ ओबीसी नगरसेवकाचीच निवड करावी, यासाठी बारा बलुतेदार महासंघ आणि ओबीसी महासंघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पहिल्या सव्वा वर्षात कुणबी दाखला आणलेल्या नितीन काळजे यांना महापौरपद देऊन भाजपने शहरातील ओबीसी समाजाची घोर फसवणूक केली. आता नवीन महापौर निवडण्याची प्रक्रिया सुरू असून, हे पद मूळ ओबीसी नगरसेवकाला न मिळाल्यास आगामी निवडणुकांमध्ये शहरातील ओबीसी समाज भाजप-शिवसेनेला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, असा गर्भित इशाराच या संघटनांनी दिला आहे.

या दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी पिंपरीत पत्रकार परिषद घेऊन मूळ ओबीसींना डावलण्याचे कटकारस्थान खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितले. यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे उपाध्यक्ष प्रताप गुरव, युवा प्रदेशाध्यक्ष विशाल जाधव, संघटक प्रदीप पवार, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आनंदा कुदळे , भिकाजी भोज, वैजनाथ शिरसाट, सुरेश गायकवाड, नंदा कऱ्हे, भारत भोसले आदी उपस्थित होते.

बारा बलुतेदार महासंघाचे उपाध्यक्ष प्रताप गुरव म्हणाले, “पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातून कुणबी जात दाखल्यावर विविध राजकीय पक्षांकडून निवडून आलेल्या सदस्यांविरोधात जात पडताळणी समिती तसेच न्यायालयाकडे दावे प्रलंबित आहेत. या दाव्यांच्या सुनावणी प्रसंगी बारा बलुतेदार महासंघ आणि ओबीसी महासंघाच्या प्रतिनिधींना बाजू मांडण्यासाठी संधी देण्यात यावी अशी लेखी मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित आहे. या महापालिकेत भाजपची प्रथमच सत्ता आली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीसोबतच महापालिकेच्या निवडणुकीतही ओबीसी समाज भाजप आणि शिवसेनेच्या पाठीशी बहुसंख्येने उभा राहिला. त्यामुळेच केंद्र, राज्य आणि पुणे, पिंपरी चिंचवडसह अनेक महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली. परंतु सत्ता आल्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध पद वाटपात मूळ ओबीसी समाजावर अन्याय केला असल्याचे ठिकठिकाणी निदर्शनास आले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेत कुणबी दाखल्यावर निवडून आलेल्या अनेक सदस्यांविरोधात जात पडताळणी समितीसमोर व विविध न्यायालयात आक्षेपाचे दावे प्रलंबित आहेत. तरी देखील अशा नगरसेवकांना भाजपने मूळ ओबीसींना डावलून विविध पदांवर नियुक्त केले आहे.

भाजपने केलेल्या या राजकारणामुळे मूळ ओबीसी नगरसेवकांवर अन्याय झाला आहे. यामुळे राज्यात बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजामध्ये भाजपा व शिवसेने विरोधात प्रचंड नाराजीची भावना आहे. भाजपने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी कुणबी जात दाखला सादर करुन निवडून आलेले नितीन काळजे यांची निवड केली. वस्तुत: नितीन काळजे यांच्याविरुध्द घनशाम खेडकर यांनी दाखल केलेला दावा न्यायालयात प्रलंबित आहे. तरीही मूळ ओबीसी नगरसेवकाला डावलून काळजे यांना महापौर केले गेले. हा मुळ ओबीसी समाजावर अन्याय आहे. सव्वा वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे नितीन काळजे यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला आहे.

अडीच वर्षाच्या उर्वरीत कालावधीसाठी नवीन महापौर निवडीची प्रक्रिया सुरू आहे. महापौरपदावर मूळ ओबीसी नगरसेवकाला भाजपने संधी द्यावी. तसेच आगामी काळातही ओबीसींसाठी राखीव असणाऱ्या सर्व पदांवर मूळ ओबीसी सदस्यांचीच नियुक्त करावी. अन्यथा शहरातील ओबीसी मतदार आगामी निवडणुकांमध्ये भाजप, सेनेला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. ओबीसींना डावलणाऱ्या भाजपविरोधात संपूर्ण समाज रस्त्यावर उतरेल. केवळ राजकारणासाठी ओबीसींचा राजकीय बळी देणे भाजपने थांबवावे. अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे, असा इशारा त्यांनी दिला.”