पिंपरीच्या महापौरपदावर माळी समाजाच्याच नगरसेवकाची निवड  न केल्यास परिणामांना सामोरे जा; माळी समाजाचा भाजपला इशारा

0
4829

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदावर माळी समाजाच्याच नगरसेवकाचीच निवड करावी, अशी एकमुखी मागणी शहरातील माळी समाजाच्या वतीने शनिवारी (दि. २८) आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांनी केली.

नगरसेविका अश्विनी जाधव, स्वीनल म्हेत्रे, नम्रता लोंढे, माजी नगरसेवक अजय सायकर, सुनिल लोखंडे, प्रभाग स्वीकृत सदस्य सागर हिंगणे, अजित बुर्डे, माजी सरपंच मंगलताई आल्हाट, पिंपरी-चिंचवड माळी महासंघाचे आनंदा कुदळे, काळूराम गायकवाड, ईश्वर कुदळे, हनुमंत माळी, अनिल साळुंखे, सुरेश गायकवाड, समता परिषदेचे मच्छिंद्र दरवडे, योगेश लोंढे, मारूती जांभुळकर, संजय ताम्हाणे, हणुमंत म्हेत्रे, महात्मा फुले जनसेवा मंडळाचे अजय जाधव, दशरथ डोके, रमेश गिरमे, विठ्ठल लडकत, अरविंद दरवडे, रामभाऊ दरवडे, राजाभाऊ भुजबळ, रामहरी सायकर, पांडूरंग दर्शिले, शिवाजी बोराटे, प्रदिप आहेर, हिरामण बुर्डे, माणिक बुर्डे, ज्ञानेश्वर रासकर, संतोष जाधव, चंद्रकांत बुर्डे, आत्माराम माटे, सुहास ताम्हाणे, अरविंद दरवडे, उत्तम ताजणे, विनायक जाधव आदींसह विविध गावातील माळी समाजाचे ज्येष्ठ प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुरेश म्हेत्रे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौरपद ओबीसी समाजासाठी राखीव आहे. या पदावर अगोदरच मूळ ओबीसींना निवडले जावे, अशी मागणी होती. परंतु, भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी कुणबी जात दाखल्यावर निवडून आलेल्या नितीन काळजे यांची निवड केली. त्यामुळे समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. नितीन काळजे यांनी चार दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता माळी समाजाचाच महापौर व्हावा यासाठी संपूर्ण शहरातील माळी समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संघटना तयारीला लागले आहेत. आमचा समाज ’अभी नही तो कभी नही’असा नारा देऊन भाजपाला इशारा देत आहे. शहराचा पुढील महापौर हा माळी समाजाचाच व्हावा असा आग्रह करण्यात येत आहे.

लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत शहरात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या माळी समाजाने भाजपच्या बाजूने मतदान केले आहे. शहरामध्ये तीनही विधानसभा मतदारसंघात एक लाख ८० हजाराहून जास्त माळी समाजाची लोकसंख्या आहे. शहरात भाजपची सत्ता येण्यामध्ये माळी समाजाचे महत्वपूर्ण योगदान आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपासून महापौरपदावर अनिता फरांदे, अपर्णा डोके आणि डॉ. वैशाली घोडेकर या माळी समाजातील महिला नगरसेविकांना काम करण्याची संधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. परंतु माळी समाजाच्या पुरुष नगरसेवकांना आतापर्यंत महापौरपद मिळालेले नाही. आता महापौरपद इतर मागासवर्गासाठी राखीव असल्यामुळे माळी समाजातील पुरूष नगरसेवकांना महापौर होण्याची संधी प्राप्त झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीष बापट, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे समाजाच्या वतीने निवेदन देऊन पिंपरी चिंचवड शहराचा पुढील महापौर माळी समाजाचाच असावा, अशी मागणी आम्ही करणार आहोत. पिंपरी चिंचवड शहराचा प्रथम माळी पुरुष महापौर व्हावा हीच सर्वांची इच्छा आहे. जर आता माळी समाजाला महापौर पदासाठी डावलले गेले तर आगामी निवडणुकांमध्ये भाजपला होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा माळी समाजाकडून आम्ही देत आहोत.”