Pune

पास, नापास होणे याचा आयुष्याशी काहीही संबध नसतो – राज ठाकरे

By PCB Author

June 16, 2019

पुणे, दि. १६ (पीसीबी) – पास, नापास होणे याचा आयुष्याशी काहीही संबध नसतो. त्यामुळे प्रत्येकाने एक लक्षात ठेवा की नुसत्याच नोकऱ्यांच्या मागे न लागता एका ठिकाणी शांत बसून स्वतः मधील गुण शोधा आणि त्याप्रमाणे काम करा. प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात, ते शोधण्याचा प्रयत्न करा, असा मोलाचा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

हडपसर येथील मनसे नोकरी महोत्सवामध्ये उपस्थित तरुणांना राज ठाकरे यांनी  मार्गदर्शन केले. हडपसर येथील बंटर स्कूल येथे पुणे महापालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांनी मनसे नोकरी महोत्सवाचे आयोजन केले होते.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी लहान असताना दादर येथील एक वडापाव खाण्यास जात असे. त्यावेळी साध्या वडापावच्या त्या दुकानावर काही दिवसांनी आयकर विभागाचा छापा पडला. त्यावेळी त्या विक्रेत्याची कमाई किती असेल? पण त्या विक्रेत्याने स्वतः मधील टॅलेंट ओळखल्यामुळे व्यवसायामध्ये यशस्वी झाला. तरुणांनी स्वतःमधील टॅलेंट वाया घालवू नका, स्वतः ला सिद्ध करा,  असे  त्यांनी  तरुण वर्गाला मार्गदर्शन केले.