पावसाळ्यात शहरातील या 11 ठिकाणी पुराचा धोका

0
509

पिंपरी दि. १७ (पीसीबी) – पावसाळ्यात पाणी घुसून पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील 11 ठिकाणांची यादी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यात वाकड, दापोडी, सांगवी, पिंपरी, चिंचवड, कासारवाडी, फुगेवाडी, पिंपळे-सौदागर, पिंपळे गुरव, रहाटणी आणि चोवीसवाडी या गावांचा समावेश आहे.

आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांनी मोसमी पावसाचे आगमन झाल्यानंतर मुख्यालयात थांबण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. तसेच जिल्ह्यामधील पूरप्रवण गावांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील 11 गावांचा समावेश आहे. या गावांकडे विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्या वाहत आहेत. या नद्यांपैकी पवना नदीच्या पुराचे पाणी प्रामुख्याने चिंचवडगाव आणि पिंपरीतील काही भागाला दरवर्षी पुराचा धोका असतो. मुळा नदीचे पाणी सांगवी, पिंपळे-गुरव, पिंपळे-सौदागर या भागात अनेक वेळा घुसले आहे. यंदा मान्सूनचा पाऊस वेळेवर दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्यामुळे शहरात पावसाळ्यातील पूर्व कामे महापालिकेच्या वतीने युध्दपातळीवर सुरू आहे. शहरातील नालेसफाई सुरू असून 5 जूनपूर्वी हे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाने उदिष्ट ठेवले आहे. वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्यांची छाटणी सुरू आहे. तसेच शहरातील रस्ते खोदाईची कामे लवकरात-लवकर पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानेही पावसाळा आणि पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय उपाय-योजना कराव्यात, या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. नदीकाठच्या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांचा व्हॉट्‌स ऍप ग्रुप तयार केला आहे. पिंपरी आणि सांगवी भागात दरवर्षी पाणी शिरण्याच्या घटना घडत असतात. त्यादृष्टीने महापालिका प्रयत्न करत असते. जोरदार पाऊस कोसळत असताना पूरप्रवण भागात गस्त पथक, अग्निशामक दलाच्या गाड्यांसह विविध यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांने सांगितले