Maharashtra

पावसाळी अधिवेशनात एकनाथ खडसेंनी केली सरकारवर प्रश्नांची सरबत्ती

By PCB Author

June 19, 2019

मुंबई, दि. १९ (पीसीबी) –  विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आज (बुधवार) सकाळी विधानसभेचे कामकाज सुरु होताच प्रश्नोत्तराच्या तासात विरोधकांपेक्षा  सत्ताधारी पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी सरकारला धारेवर धरले.

एकनाथ खडसे यांनी सौरपंपांच्या विषयावरुन  आणि  आदिवासी भागातील कुपोषणाच्या विषयावरून संबंधित मंत्र्यांना खडे बोल सुनावले. कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती सरकारच्या काळातच गेले आहेत, असा  आरोप खडसे यांनी यावेळी केला. तसेच नवीन आदिवासी मंत्र्यांच्या उत्तरांवर संताप व्यक्त करत   खडसेंनी सरकारचे वाभाडे काढले.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी ( दि,१६) करण्यात आला.  नव्या मंत्रिमंडळात पक्षाच्या निष्ठावान आमदारांना डावलून  आयात नेत्यांना प्राधान्याने संधी  देण्यात आली. यावर नाराजी व्यक्त करत  खडसे यांनी पक्षाला आता पक्ष विस्तारासाठी आयात नेत्यांची गरज वाटू लागली आहे, अशी टीका केली.