पावसाळापूर्व कामे तातडीने हाती घ्या; उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांची प्रशासनाला सूचना

0
164

पिंपरी, दि.२८ (पीसीबी) – सद्या अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने पावसाळा पूर्व कामे हाती घ्यावीत. नालेसफाई, संभाव्य पूरस्थितीच्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठीची कामे तातडीने सुरू करावीत, अशा सूचना उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच कोरोना संसर्ग परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही सर्व कामे करताना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना सुयोग्य प्रकारे अंमलात आणाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर परिसरात छोटे – मोठे मिळून 152 नाले आहेत. सद्या अवकाळी पावसाची शक्यता आहे. शहरात नाल्यांची आणि स्टॉर्म वॉटर चेंबर, लाईनची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्याची आवश्यकता आहे. गतवर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. नागरिकांना पाण्याचा सामना करावा लागला होता. त्यामुळे जिथे जिथे पाणी घरामध्ये घुसले होते. त्याची पाहणी करावी आणि तत्काळ कामाला सुरुवात करावी.

आपण स्वतः लक्ष घालून पावसाळा पूर्वीची कामे करून घ्यावीत. स्ट्रॉम वाटर लाईन टाकण्याची आवश्यकता असल्यास लाईन टाकावी. पाऊस कधी पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे महापालिकेची तयारी असली पाहिजे. गेल्यावर्षी नागरिकांना पावसाचे पाणी घरात शिरल्याने संकटांचा सामना करावा लागला होता. यंदा तो करायला लागू नये, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात सर्व अधिकारी व्यस्त आहेत. त्यामुळे काही अधिकाऱ्यावर पावसाळापूर्व कामाची जबाबदारी द्यावी आणि काम पूर्ण करून घ्यावे.

शहरातील नाल्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. काही नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग लागले आहेत. झाडांच्या फांद्या, वाढलेले गवत, चेंबरवर नसलेले झाकण, तर काही ठिकाणी टाकलेला मातीचा भराव यामुळे पावसाळ्यात पावसाच्या पाण्याला अडथळा होऊन रस्त्यावर तळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्टॉर्म वॉटर लाइनच्या चेंबर तसेच नाल्यामध्ये माती व कचरा पडल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो, त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून घाणीचे साम्राज्य व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवु नये यासाठी पावसाळ्यापूर्वी सर्व स्टॉर्म वॉटर लाइनचे चेंबर व सर्व नाल्यांची साफसफाईच्या कामास सुरुवात करण्यात यावी अशी सूचना उपमहापौर घुले यांनी केली आहे.