Maharashtra

पावसामुळे विधान भवनातील वीजपुरवठा खंडित; कामकाज ठप्प

By PCB Author

July 06, 2018

नागपूर, दि. ६ (पीसीबी) – नागपूर शहरात रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे विधीमंडळातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तळघरात पाणी साचल्याने विधान भवनातील वीज पुरवठा खंडीत केल्याचे सांगितले जात आहे. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून अंधारामुळे विधान भवनातील कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे सरकारची नाचक्की झाली आहे. वीज नसल्याने कामकाज थांबवावे लागल्याची ही पहिलीच वेळ असल्याने सरकारचा नाकर्तेपणा दिसून आल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

पावसाळी अधिवेशनाचा आजचा (शुक्रवारी) तिसरा दिवस आहे. गुरुवारी रात्रीपासून नागपूरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे विधान भवनाच्या परिसरात पाणी साचले. सकाळी विधान भवनात प्रवेश करताना आमदारांची तारांबळ उडाली. विधान भवनातील वीज पुरवठाही खंडीत झाल्याने कामकाज ठप्प झाले आहे. आमदारांना अंधारातच बसावे लागले.   नाणारवरून शिवसेना आमदारांनी मोबाईलमधील टॉर्चच्या प्रकाशात घोषणाबाजी केली.

विधान भवनातील वीज गायब झाल्याने सरकारची नाचक्की झाली आहे. सरकारच्या हट्टीपणामुळे ही वेळ ओढावल्याची टीका विरोधकांनी केली. मुंबई तुंबताना बघितली, पण आज काही तासांच्या पावसात नागपूरही तुंबताना बघितले, असा टोला अजित पवार यांनी लगावला. सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे विधीमंडळाचे कामकाज वाया गेल्याचे टीका पवार यांनी केली.