पालघर मतदारसंघ शिवसेनेला, तर मावळ मतदारसंघ भाजपला? भाजपची शिवसेनेकडे मावळची मागणी

0
966

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – अखेर शिवसेना भाजप यांच्यामध्ये जागावाटपबाबत समझोता झाला असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये जागावाटपाची बोलणी सुरू  आहेत. भाजपने शिवसेनेला पालघर लोकसभेची जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. तर  त्याबदल्यात शिवसेनेकडे असेलली मावळ लोकसभा जागेची मागणी केली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे.   

युतीची चर्चा करण्यासाठी  दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये  बैठका सुरू आहेत. गुरुवारी (दि.१४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख  उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी जळगाव, भिवंडी आणि पालघर या तीन जागांपैकी एक जागा  देण्याची मागणी शिवसेनेने भाजपकडे केली होती.  त्यानंतर पालघरची जागा सोडण्यास भाजपने तयारी दाखवली आहे. मात्र, या जागेच्या बदल्यात भाजपने शिवसेनेकडे मावळच्या जागेची  मागणी केली आहे.  दरम्यान, यावर शिवसेनेने अद्याप कोणतीही  प्रतिक्रिया दिलेली नाही.

मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार  श्रीरंग बारणे हे प्रतिनिधीत्व करत आहेत. तर  पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष व आमदार  लक्ष्मण जगताप मावळमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. २०१४ मध्ये आमदार जगताप यांनी या मतदारसंघातून लोकसभा लढवली होती. त्यावेळी त्यांनी चांगली लढत देत लक्षणीय मते मिळवली होती. सध्या मावळमध्ये भाजपची ताकद वाढली आहे.  त्यामुळे भाजपने मावळची जागा शिवसेनेकडे मागितली आहे. मावळ मतदारसंघात  रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा आणि पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत युती झाली आणि मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला, तसेच शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिली. तर आम्ही बारणे यांचे काम करणार नाही, अशी भूमिका पिंपरी महापालिका भाजपचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी महापौर शैलजा मोरे, नगरसेवक नामदेव ढाके, शितल शिंदे, नगरसेविका शर्मिला बाबर, अनुराधा गोरखे, शारदा सोनवणे यांनी घेतली आहे. याबाबत त्यांनी पिंपरी दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले होते.

श्रीरंग बारणे हे मावळमध्ये युतीचे उमेदवार असतील, तर आम्ही आमचा निर्णय घेण्यास समर्थ आहोत, याची पक्षाने दखल घ्यावी. पक्षाने आमच्यावर करवाई केली तरी बेहत्तर पण आम्ही श्रीरंग बारणे यांचे काम करणार नाही, याची आपण आताच नोंद घ्यावी, असा आक्रमक पवित्रा या नगरसेवकांनी घेतला होता.

या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेकडे मावळची जागा मागितली आहे, आता ही जागा शिवसेना भाजपला सोडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजपने ही जागा  आपल्याकडे घेतल्यास येथून आमदार लक्ष्मण जगताप यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. खासदार बारणे यांना भाजप नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यातच आता भाजपने मावळची जागा शिवसेनेकडे मागितली आहे. त्यामुळे शहर भाजप आणि शिवसेनेत चांगलाच वाद रंगण्याची शक्यता आहे.