पालघर नगरपरिषदेवर युतीचे वर्चस्व; नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे

0
681

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – पालघर नगरपरिषद निवडणूकीत भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले आहे. मात्र, नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला केदार काळे या विजयी झाल्या आहेत. त्यामुळे नगरपरिषदेध्ये युतीने झेंडा फडकावला असला तरी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस विराजमान होणार. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून देण्यात येतो. यामध्ये मतदारांनी नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे यांना निवडणूक दिले आहे.

पालघर नगरपरिषदेच्या १४ प्रभागांमधील २८ जागांचे आज निकाल जाहीर करण्यात आले. पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच पालघर नगरपरिषदेची निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरले होते. शिवसेना-भाजप-रिपाइं युती, काँग्रेस-राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष असा सामना येथे रंगला. ९० उमेदवारांनी आपले नशीब अजमावले होते. यामध्ये भाजप-शिवसेना-रिपाई युती सरकाने बहुमत मिळवत एकूण २१ जागेवर झेंडा फडकावला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला २ आणि अपक्षांनी 5 जागा जिंकल्या.

नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राष्ट्रवादीतून आयात केलेल्या श्वेता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला काळे, तर शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार अंजली पाटील, असे तीन उमेदवार उभे होते. त्यापैकी राष्ट्रवादीच्या उज्वला काळे यांनी १०६९ मतांनी विजय मिळवला.