पालखी सोहळ्यातील दिंड्यांसाठी मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पिण्याच्या पाण्याचे टँकर

0
726

 पिंपरी, दि, २४ (पीसीबी) – संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, म्हणून पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पालखी सोहळ्यातील दिंड्यांसाठी चार पाण्याचे टॅंकर देण्यात येत आहेत. अशी माहिती मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार यांनी दिली.

पुणे वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक संजय मारणे, ह.भ.प. माऊली कोकाटे महाराज, दत्त सेवा आश्रमाचे ह.भ.प. शिवानंद महाराज, ह.भ.प. तांदळे महाराज, ह.भ.प.काळे महाराज, शिव कीर्तनकार इतिहासकार डॉ. गजानन व्हावळ, समाज प्रबोधनकार शारदा मुंडे, भंडारा डोंगर ट्रस्टचे सदस्य जगन्नाथ नाटक पाटील, मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, सूर्यकांत वाघमारे, ह.भ.प. तुकाराम महाराज, सेवानिवृत्त वनपरिमंडल अधिकारी रमेश जाधव, विश्व हिंदु परिषद,पश्चिम महा.प्रांत सेवा प्रमुख दादा ढव्हाणे, सूर्यकांत कुरुलकर, दत्तात्रय धोंडगे यांच्या हस्ते टँकरचे पूजन करून टँकर रवाना करण्यात आले.

पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी-चिंचवड शहर यांच्यातर्फे ही सेवा देहू-आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण पालखी मार्गावर देण्यात येणार आहे. टॅंकरचे पूजन करून वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले. या टॅंकरद्वारे जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील प.पू.श्री. रामकृष्ण प्रासादिक दिंडी क्र. 221, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी समाज, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील ह. भ. प. सोपान काका कराडकर दिंडी क्र ११ आणि ह.भ.प. मठाधिपती मुक्‍ताबाई महाराज बेलगावकर दिंडी क्र. 59 अशा चार दिंड्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे.

अरुण पवार म्हणाले, वारकऱ्यांना वारीत पिण्यासाठी पाणी मिळत नाही. यंदा तर दुष्काळी परिस्थिती आहे. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ट्रस्टतर्फे टॅंकर सुविधा उपलब्ध करून दिली जाते. हीच पांडुरंगचरणी आमची सेवा आहे.