Maharashtra

पालकमंत्र्यांचा अजब सल्ला; शिंदेंच्या बंगल्यावर जनावरे बांधणार, राष्ट्रवादी-काँग्रेसकडून निषेध

By PCB Author

December 07, 2018

अहमदनगर, दि. ७ (पीसीबी) – ‘चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांच्या घरी नेऊन सोडा,’ असा अजब सल्ला देणारे अहमदनगरचे पालकमंत्री आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जनावरे नेऊन निषेध नोंदवणार आहेत.

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमवेत असलेले शिंदे हे पथक जिल्ह्याबाहेर गेल्यानंतर पाथर्डी येथील विश्रामगृहावर आले होते. तेथे काही शेतकरी त्यांना भेटायला आले होते. दुष्काळामुळे चारा छावण्या सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती, पण शहरी भागात अशा छावण्या सुरू करण्यास अडचणी येत असल्याचे सांगताना शिंदे यांनी पाहुण्यांकडे (नातेवाईक) जनावरे नेऊन घालण्याचा सल्ला दिला. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर राजकीय क्षेत्रातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावरही अनेकांनी शिंदेंच्या वक्तव्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडमधील पदाधिकारी शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी जनावरं बांधून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवणार आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि कर्जत-जामखेडचे पक्षनिरीक्षक किशोर मासाळ, राजेंद्र फाळके, प्रा. मधुकर आबा राळेभात, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता वारे, युवा नेते अमजद पठाण, संजय वराट, शरद शिंदे, उमर कुरेशी, डॉ. कैलास हजारे, नितीन हुलगुंडे, पवन राळेभात, अमोल गिरमे, किरण सुरवसे आदी पदाधिकाऱ्यांसह पक्षाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहे.