Banner News

पार्थ पवार भाजपच्या वाटेवर ?

By PCB Author

August 15, 2020

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – शरद पवार यांनी खडसावल्यानंतर नाराज झालेले पार्थ पवार पवार कुटुंबातल्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. पार्थ पवार हे आता पुण्यात त्यांचे चुलत काका अभिजीत पवार यांच्या भेटीला गेले आहेत. पुढचा निर्णय घेण्याआधी पार्थ आपले काका आणि आत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानुसार काका अभिजीत पवार यांना भेटण्यासाठी पार्थ पवार गेले आहेत. दुसरीकडे अजित पवार हेदेखील उद्या कुटुंबासह बारामतीच्या पवार कुटुंबाचं घर असलेल्या काटेवाडीत जाणार आहेत. यावेळी ते श्रीनिवास पवार यांची भेट घेणार आहेत. 

पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पार्थ पवार कमालीचे दुखावले गेले. नाराज झालेले पार्थ पवार हे मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. मोठा निर्णय घेण्याआधी पार्थ पवार कुटुंबातल्या व्यक्तींशी चर्चा करत असल्याचंही सांगितलं जात आहे.

दरम्यान, पार्थ पवार यांनी काल शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन सुप्रिया सुळेंची भेट घेतली. जवळपास सव्वादोन तास पार्थ पवार सिल्व्हर ओक बंगल्यावर होते. कालच सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांचीही भेट घेतली. बुधवारी शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत वक्तव्य केल्यानंतर काहीच वेळात अजित पवार सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी पोहोचले. तिकडे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांची बैठक झाली.

आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार समर्थक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. सुनिल तटकरे, धनंजय मुंडे आणि आदिती तटकरे हे नेते शरद पवारांच्या भेटीला गेले होते. तीन दिवसांतील भेटीगाठी नंतरही अजित पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ यांची नाराजी कायम आहे. आजोबांच्या भुमिकेमुळे आपल्याला भविष्यात राजकीय संधी मिळणार नाही याची खात्री पटल्याने पिता पुत्रांनी दुसऱ्या पर्यांयाची चाचपणी सुरू केली आहे. दै. सकाळ चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांचे भाजप नेत्यांशी (नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस) यांच्याशी विशेष सख्य आहे. ते भाजपच्या खुपच जवळ गेले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकित पुणे लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजप संधी देणार अशीही चर्चा होती. त्यानंतर राज्यसभेवर त्यांना घेणार अशीही वदंता होती. शरद पवार यांची राजकीय भुमिका त्यांनाही खटकत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पार्थ यांची अभिजित पवार यांच्याशी भेट महत्वाची समजली जाते.