पार्टी कल्चरला लगाम, हॉटेलांचे काय होणार ? कोरोना आख्यान भाग ५ – अविनाश चिलेकर

0
618
  • पार्टी कल्चरला लगाम, हॉटेलांचे काय होणार ?

कोरोना आख्यान भाग ५ – अविनाश चिलेकर

कोरोनामुळे विविध धंद्यांची पार वाट लागली. अगदी कंबरडे मोडले असे म्हटले तरी चालेल. त्यात पहिल्या क्रमांकावर शहरातील लहान मोठ्या हॅटेल, रेस्टॅरंट, बार, खानावळींची धुळधान होणार हे वास्तव आहे. दीड महिना या उद्योगाचे भटारखाने बंद स्थितीत आहेत. कोट्यवधींची गुंतवणूक, शेकडो वेटर, आचारी, मदतनीस, मोलकरणी अशा किमान दहा हजार कष्टकऱ्यांची रोजी रोटी बंद आहे. त्यांचे मालकांची अवस्था डोळ्यात पाणी आणनारी आहे. पिंपरी चिंचवड शहरात सुमारे दीड हजारावर लहान मोठी हॅटेलस् आहेत. पाचशेवर खानावळी रोज भरभरून चालतात. नवीन लोक या धंद्यात येत होते. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना गुंतवणुकिचा आणि मुबलक परतफेड देणारा हा धंदा. ऐकेकाळी शेट्टी कंपनी म्हणजे हॅटेल असे समिकरण होते. गेल्या दहा पंधरा वर्षांत ते बदलले. शहरातील भूमिपुत्रांनी त्यात प्रवेश केला आणि प्रगती केली. तेच खानावळींचे झाले.

कोरोनामुळे दीड महिन्यांपासून बंद असलेला धंदा आता कायमचा बसतो की काय अशी गत आहे. कामगारांशिवाय हा धंदा चालणे अशक्य असते. कोरोनाचा पहिला आठवड्याचा बंद सुरू झाला त्याचवेळी हे कामगार आपापल्या गावाला गेले. आता ते येतील याची शाश्वती नसल्याने जरी उद्या धंदा सुरू करायचा तर कपबश्यासुध्दा मालकालाच उचलाव्या लागतील अशी परिस्थिती आहे. हॅटेलमध्ये जेवणारांची संख्या वाढत गेल्याने या धंद्याला बरकत होती. पुणेकर घरी जेवतात की नाही असे गंमतीने म्हटले जाते कारण हॅटेलींग वाढले होते. नोकरी लागली, बढती झाली, लग्न ठरले, वाढदिवस आहे, लग्नाची वर्षगाठ कायम ठेवायचीय अशा अनेक कारणांनी हे कल्चर डेव्हलप झाले. आयटी मध्ये आठवड्यातून एकदा मित्र परिवाराची पार्टी ठरलेली. आता कोरोनामुळे किमान पुढचे वर्षभर एक बंधन राहील. त्यामुळे एका टेबलावर जास्तीत जास्त दोघे बसून जेवतील. सहकुटुंब जेवणाचा आनंद हिरावून घेतला जाईल. पार्टी कल्चरला मोठा धक्का बसणार आहे. आणि पार्ट्यांशिवाय धंदा नाही. या कल्चरला चाप लागणार आहे. सुमारे ५० ते ६० टक्के कमाई देणारा हा धंदा आता दिवाळखोरीत निघतो की काय अशी स्थिती आहे. ज्यांनी कमावले, दोनची चार हॅटेल केली किंवा ज्यांच्याकडे क्षमता आहे ते सावरतील. किमान ७० टक्के नवखे झोपले. कर्ज घेऊन धंदा सुरू करणारे दीड महिन्यांच्या बंदमुळे हातघाईला आले. या तमाम मंडळींना ना सरकार मदत करणार ना संस्था, संघटना. त्यांना त्यांचा मार्ग धुंडाळावा लागेल.

आता मुळात नवीन एक पार्सल कल्चरने जोर धरला आहे. घरोघरी अगदी आजी आजोबांनासुध्दा एक दिवसाआड पार्सलची खमंग, चटकदार भाजी लागते. झोमॅटो, स्विगी यांचा धंदा दोन वर्षात इथे तिप्पटीने वाढला. कारण नवीन पार्सल कल्चर. इथे हॅटेलमध्ये जाण्यापेक्षा घरीच शिवाय सवलतीच्या दरात घरपोहच मिळते त्याचा आनंद असतो. दुसरीकडे हॅटेलमधील त्या मालकाचा लाईट, पाणी पासून सर्व खर्च वाचतो. आता बहुसंख्य हॅटेल मालकांनी या कंपन्यांची फ्रन्चयजी घेतली. आता तोच मुख्य धंदा होईल असे दिसते. काही हुशार व्यावसायिकांनी दोन चार कोटींचे हॅटेल सुरू करण्यापेक्षा आडरानात किचन उभे केले आणि पार्सल धंदा सुरू केला. कोरोनानंतर याला बरकत येणार आहे. कारण संपर्क, सहवास, गर्दी नको आहे. सहानुभूती म्हणून पालिका एक दोन वर्षे मिळकतकर, पाणी पट्टीत सवलत देईल. पुढचा रस्ता शोधावा लागेल. नवीन जगाची चव, आवड, निवड पाहून पावले उचलली तर वाचतील नाहीतर दिवाळे ठरलेले.