पादचा-याच्या मृत्यू प्रकरणी महावितरणच्या कर्माचा-यासह दोघांवर गुन्हा

0
219

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – रस्त्याने जाणा-या पादचा-याला विजेच्या खांबावर असलेल्या उघड्या वायरमुळे शॉक लागला. त्यात पादचारी व्यक्ती रस्त्यावर पडली. त्यानंतर व्यक्तीच्या अंगावरून ट्रक गेल्याने पादचारी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 19) सायंकाळी साडेसहा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर धावडे वस्ती, भोसरी येथे घडली. याबाबत महावितरणच्या संबंधित कर्माचा-यावर आणि ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवी महादेव जोगदंड (वय 45, रा. अजंठानगर, निगडी) असे मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ धीरज महादेव जोगदंड (वय 29, रा. च-होली) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 20) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रक चालक विठ्ठल लक्ष्मण राठोड (वय 34, रा. उंब्रज शिवडे, ता. कराड, जि. सातारा) आणि एमएसईबीचा संबंधित कर्माचारी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता मयत रवी पुणे-नाशिक महामार्गावरून धावडेवस्ती, भोसरी येथून रस्त्याने पायी चालत जात होते. रोशल गार्डन समोरून रस्ता ओलांडत असताना त्यांना डिव्हायडर वरील विद्युत खांबावरील उघड्या तारेचा शॉक लागला. यात जखमी झालेले रवी रस्त्यावर पडले.

त्यानंतर ट्रक चालक राठोड याने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात चालवून रवी यांना चिरडले. त्यात रवी यांचा जागेवरच मृत्यू झाला. महावितरणच्या कर्माचा-यांनी त्यांच्या कामात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा करून रस्त्यावरील खांबावरील वायर झाकून न ठेवता उघडी ठेवली. यामुळे हा अपघात झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.