पाणी प्रश्नांवर सत्ताधारी, विरोधी नगरसेवकांकडून प्रशासन धारेवर

0
711

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी- चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरले असताना शहरात पाणीटंचाई तीव्र आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला असताना आयुक्तांचे नियंत्रण आणि वचक राहिलेला नाही. ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागातील ठेकेदार महापालिकेचे जावई आहेत क? अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात संगनमत आहे, अशा शब्दांत हल्ला चढवत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पाणी प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले.

महापालिकेची जुलै आणि ऑगस्ट महिन्यांची तहकूब केलेली सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. तर प्रमुख उपस्थिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांची होती. तब्बल सात तास चाललेल्या सभेत पाणीप्रश्नांवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

उपमहापौर सचिन चिंचवडे म्हणाले की, महापौर आणि आयुक्त पाणीकपात आम्ही केलेली नाही, असे सांगून हात झटकत आहे. मग महापालिका काय बाहेरील एखादी शक्ती चालवत आहे का? असा संतप्त सवाल केला. माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी पाणीपुरवठा सुरळीत करा. अन्यथा राजीनामा देईल, असा इशारा दिला.

लोकांची कामे करण्यासाठी आम्हाला निवडून दिले आहे. पाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास अधिकाऱ्यांना पाण्याच्या टाकीवरून फेकून देईन, असा इशारा अंबरनाथ कांबळे यांनी दिला.

पाणी, कचरा, सांडपाणी, आदी समस्या सोडविण्यास महापालिका सक्षम नाही. आयुक्तांचे प्रशासनावर नियंत्रण नसल्याने समस्या जटील बनल्या आहेत, अशी टीका  आशाताई शेंडगे यांनी केली. पाणीप्रश्नांवर नागरिकांच्या वाढत्या तक्रारी येऊ लागल्याने रक्तदाब वाढला आहे, असे प्रवीण भालेकर यांनी सांगितले.

राहुल कलाटे म्हणाले की, प्रशासनावर कंट्रोल नाही, पाणीपुरवठा करण्याबाबत योग्य अंमलबजावणी करण्यापेक्षा अधिकारी प्रयोग करण्यात व्यस्त आहेत. जनतेला वेठीस धरले जात आहे. महापौर आयुक्त गटनेत्यांना विश्वासात घेत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

एकनाथ पवार म्हणाले की, पाणी प्रश्नांवर राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी प्रामणिकपणे काम करून प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करावी. कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, असा सुचना करून येत्या वर्षभरात पवना जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पाणी प्रश्नांवरील चर्चेत सुजाता पलांडे, नाना काटे, जावेद शेख, सुलक्षणा धर, सचिन चिखले, बाबू नायर, माया बारणे, सांगिता ताम्हणे, संतोष लोंढे, मिनल यादव, संतोष चोपडे, हर्षल ढोरे, शत्रुघ्न काटे, उषा मुंढे, शर्मिला बाबर, निता पाडुळे, वैशाली काळभोर, पौर्णिमा सोनवणे, शितल शिंदे आदी ४७ नगरसेवकांनी सहभाग घेतला.

महापौर राहुल जाधव म्हणाले की, पाणी प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पाणीपुरवठा जलनिस्सारण समिती स्थापन करण्यात येईल. येत्या तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. सोमवारी समितीची बैठक घेण्यात येईल. अनधिकृत नळजोड करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगून ही सभा ३ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली.