पाणी पुरवठा विभागाच्या निविदा ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून, मोठा भ्रष्टाचार – पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांचा गंभीर आरोप

0
315

पिंपरी, दि. ३१ (बीपीसी) – पिंपरी-चिंचवड महापालिका पाणी पुरवठा विभागात ठराविक ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून रिंग करण्याचा उद्योग चालतो तो थांबवावा, असा गंभीर आरोप सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला आहे. एकाच कामाच्या तीन वेळा निविदा काढल्या, त्यासाठी अटी शर्थींमध्ये मनमानेल असे बदल केले गेले. या कामात मोठा भ्रष्टाचार असल्याचे सांगत प्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार कऱणार असल्याचा इशारा वाघेरे यांनी दिला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना त्याबाबतचे एक पत्र त्यांनी दिले.

आयुक्तांना दिलेल्या पत्रात वाघेरे म्हणतात, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयातून पाणी पुरवठा विभागात 2 जानेवारी 2020 रोजी शहरातील प्रभागांनुसार पाणी पुरवठा दुरुस्ती व परिचलन कामाची निविदा (निविदा क्र. पाणी पुरवठा/मुख्यालय/12/21/2019-20) काढण्यात आली होती. वास्तविक पाहता त्यामध्ये दुरुस्ती व परिचलनचे काम वेगवेगळे काढण्याची गरज होती. कारण दुरुस्ती करणार्‍या ठेकेदाराकडे मजूर, कामगार पुरवठा करण्याचा परवाना नसतो तर; मजूर, कामगार पुरविणार्‍या ठेकेदाराकडे दुरुस्तीच्या कामाचा परवाना नसतो. असे दोन्ही परवाने असणारे मोजकेच ( वरिष्ठांच्या मर्जीतील ) ठेकेदार आहेत. पाणी पुरवठा विभागातील काही अधिकारी अशा ठेकेदारांना गेल्या अनेक वर्षांपासून रिंग करण्यास निविदा काढताना त्यांना हव्या असणार्‍या अटी-शर्ती टाकून सहकार्य करत आहेत. यामध्ये प्रचंड भ्रष्टाचारही होतो. परंतु; या कामासाठी अनेक ठेकेदारांनी निविदा भरल्याने स्पर्धा होणार असल्यामुळे अधिकार्‍यांनी एक निविदा पाकीट उघडलेले असताना निविदा परस्पर रद्द केली.

याच कामाची दुसरी निविदा 9 जून 2020 रोजी काढण्यात आली. या निविदेत दुरुस्ती व परिचलन कामे वेगवेगळी काढली होती. परंतु; ही निविदाही अधिकार्‍यांनी शेवटची मुदत असलेल्या दिवशी परस्पर मुदतवाढ देवून 27 जून पर्यंत निविदा मागविण्यात आली. त्यामुळे मी याबाबात 25 जून रोजी आयुक्तसाहेब आपणास पत्र दिले. या पत्रात निविदेतील जॉबवर्कची अट शिथील करुन परिचलनच्या कामाकरीता शासनाच्या इतर विभागात मजूर पुरविल्याचा अनुभवही ग्राह्य धरावा, अशी आपली मागणी होती. त्यानंतर ही दुसरी निविदाही रद्द करण्यात आली, असे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

२२ जुलै रोजी तिसर्‍यांदा या कामाची तिसरी निविदा (निविदा नोटीस क्र. पाणी पुरवठा/मुख्यालय/4/22/2020-21) काढण्यात आली आहे. परंतु; ही निविदा पुन्हा पहिल्यांदा म्हणजेच 2 जानेवारी रोजी काढलेल्या ठराविक मर्जीतील ठेकेदारांना फायदा होणार्‍या व रिंग करणार्‍या अटी-शर्तीनुसारच काढण्यात आली आहे. त्यामुळे या निविदेत दुरुस्ती करुन पाणी पुरवठ्याच्या दुरुस्ती व परिचलनचे काम वेगवेगळे काढण्यात यावे. जेणेकरुन स्पर्धा होवून महापालिकेच्या कामात पैशाची बचत होईल, असे वाघेरे यांनी पत्रात म्हटले आहे.

पाणी पुरवठ्याच्या अधिकार्‍यांनी या कामाची पहिल्यांदा व दुसर्‍यांदा काढलेली निविदा का रद्द केली याचा खुलासाही करावा. तसेच महापालिकेत ज्यावेळेस सर्वप्रथम अश्या प्रकारच्या निविदा काढण्यांत आल्या. त्यावेळेस अश्या प्रकारच्या जाचक अटी-शर्ती नव्हत्या. वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत वारंवार सांगूनही वरिष्ठ अधिकारी ठराविक ठेकेदाराचे हित पाहात असतील तर मला नाईलाजास्तव महापालिकेच्या गैरकारभारा विरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पंतप्रधान यांना तक्रार करावी लागले. याबाबत योग्य तो न्याय न मिळाल्यास न्यायालयातही जाण्याची माझी तयारी राहिल, याची नोंद घ्यावी असा इशाराही वाघेरे यांनी दिला आहे.