पाच हजाराची लाच घेताना सरपंच अॅ न्टी करप्शनच्या जाळ्यात

0
472

अप्पर, दि.२० (पीसीबी) – अधिग्रहीत विहीरीचा मोबदला देण्याच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी शेतक-याकडून पाच हजारांची लाच स्विकारणा-या सरपंचाला अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई हर्सुल भागातील रहाळपट्टी तांडा येथे करण्यात आली.

पुनमचंद रुपा चव्हाण (३८) असे सरपंचाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावदरी तांडानजीक असलेल्या रहाळपट्टी तांडा येथील शेतक-याची विहीर तहसीलदारांनी पाणी पुरवठ्यासाठी अधिग्रहीत केली आहे. त्याकरिता दररोज सहाशे रुपये याप्रमाणे महिन्याला शेतक-याला नियमानुसार धनादेशाव्दारे रक्कम दिली जाते. ही रक्कम मिळविण्यासाठी गु्रप ग्रामपंचायतीचे रहाळपट्टी तांड्याचे सरपंच पुनमचंद चव्हाण यांची प्रमाणपत्रावर स्वाक्षरी आवश्यक असते. त्यामुळे प्रमाणपत्रावर स्वाक्षरी घेण्यासाठी शेतकरी सरपंच चव्हाणकडे गेला होता. तेव्हा चव्हाणने शेतक-याकडे पाच हजाराच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे शेतक-याने अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोचे अधीक्षक अरविंद चावरिया यांच्याशी संपर्क साधून तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या अप्पर अधीक्षक डॉ. अनिता जमादार, उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप राजपुत, पोलिस नाईक रविंद्र देशमुख, रविंद्र आंबेकर, बाळासाहेब राठोड यांनी सापळा रचून आज दुपारी शेतक-याकडून लाच स्विकारताना चव्हाणला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुध्द हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक संदीप राजपुत करत आहेत.