‘पाच वर्षे थापा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मते मागताना लाज कशी वाटत नाही?’

0
452

मुंबई, दि.१९ (पीसीबी) – पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासनं देऊन तुम्हाला फक्त थापा मारल्या आज तेच सत्ताधारी तुमच्याकडे मतं मागायला कसे येतात?  त्यांना मते मागताना लाज कशी वाटत नाही?  असा प्रश्न विचारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईतल्या नेरुळ येथील सभेत भाजपा आणि शिवसेना यांच्यावर टीकास्त्र सोडले. मनसेमुळे राज्यातले ७८ टोलनाके बंद झाले. मी सत्तेच्या बाहेर राहून हे करु शकलो मग सरकार आश्वासन देऊनही हे का करु शकले नाही? त्यांना कुणी जाब का विचारत नाही असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. मी स्थानिकांचे प्रश्न मांडले तेव्हा माझ्यावर गुन्हे दाखल केले. अल्पेश ठाकोर मात्र गुजरातमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली. भाजपात प्रवेशही मिळाला.

महाराष्ट्र थंड बसला आहे, तुम्हाला गृहीत धरले जाते आहे. तुम्हाला महाराष्ट्र कुठे घेऊन जायचा आहे हा काही विचारच नाही सत्ताधाऱ्यांकडे असाही टोला राज ठाकरेंनी लगावला. ताट वाट्या घेऊन फिरत आहात. एक जण म्हणतो १० रुपयात थाळी, दुसरा म्हणतो ५ रुपयात थाळी. यांची युती आहे यांना अजून एक किंमत ठरवता येत नाही. महाराष्ट्र भिकेला लावण्याची थेरं सुरु आहेत असे म्हणत थाळी योजनेबाबतही राज ठाकरेंनी घणाघाती टीका केली. भाजपा म्हणते हे आपलेच सरकार कुणी ठरवले आपले सरकार? शिवसेना म्हणते आहे हीच ती वेळ! पाच वर्षे काय वेळ नव्हता का तुम्हाला? असा प्रश्न विचारुन राज ठाकरेंनी या दोन्ही पक्षांच्या जाहिरातींवरही टीका केली.