Desh

पाच वर्षात पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटी खर्च करणार- नरेंद्र मोदी

By PCB Author

September 07, 2019

बंगळुरू, दि. ७ (पीसीबी) – येत्या पाच वर्षात पायाभूत सोयी आणि सुविधा यांच्यासाठी १०० लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मुंबईत तीन नव्या मेट्रो मार्गांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. “आपला देश सध्याच्या घडीला ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करतो आहे. आता पुढील पाच वर्षात पायाभूत सोयी सुविधांवर १०० लाख कोटी रुपये खर्च करणार आहोत ” अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत दिली.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. इतकेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कौतुकही केले. तर उद्धव ठाकरे हे माझे लहान भाऊ आहेत असेही मोदी आपल्या भाषणात म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचेही कौतुक केले. “इस्रोचे वैज्ञानिक प्रयत्नांमध्ये कधीही कमी पडत नाहीत. एकदा त्यांनी एखादे लक्ष्य ठरवले की ते पूर्ण होईपर्यंत त्यांचे प्रयत्न सुरु असतात” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

दरम्यान गणेश विसर्जनाच्या वेळी जलप्रदूषण रोखा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्याच गणेशभक्तांना केले आहे. मुंबईत मेट्रोच्या प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पार पडला. याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. “बाप्पाला निरोप देताना खूप सारे प्लास्टिक आणि इतर कचरा समुद्रात फेकला जातो. यावेळी हा प्रयत्न करुया की असे कोणतेही सामान समुद्रात जाणार नाही ज्यामुळे जल प्रदूषण वाढीस लागेल. जलप्रदूषण वाढू शकते असे कोणतीही सामुग्री पाण्यात जाऊ नये याची काळजी घ्या” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.