Maharashtra

पाच राज्यातील निकालावर महाराष्ट्रात आत्मचिंतन व्हावे – एकनाथ खडसे

By PCB Author

December 12, 2018

जळगाव, दि. १२ (पीसीबी) – पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर संघटनात्मक व अन्य मुद्द्यांचे काय परिणाम झाले आहेत. याबाबत संशोधन करून महाराष्ट्रातील आगामी  निवडणुकांच्या दृष्टीने संघटनेला बळकटी आणण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.  

निवडणुकांमधील विजय किंवा पराभवाचा परिणाम कार्यकर्त्यांच्या मनावर होतो. त्यामुळे महाराष्ट्रात त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील, असे सांगतानाच  महाराष्ट्रात सरकारविरोधात नाराजीचा परिणाम निवडणुकांमध्ये होणार नसल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात पंधरा वर्षांपासून भाजप सरकारने  विकास केला आहे, हे मान्य करावे लागेल. मात्र, पंधरा वर्षांनंतर सरकार विरोधातील नाराजीचा फटका बसू शकतो. याचे  आत्मचिंतन करून पराभवाची कारणे शोधणे गरजेचे आहे, असे खडसे म्हणाले. मोदींनी विकासाच्या नावावर मते मागितली होती. तिन्ही राज्यांत विकास झाला हे मतदारही मान्य करतात.  मात्र, शेवटी मतदारराजाला कुणाला मत द्यायचे याचा अधिकार आहे, असे खडसे म्हणाले.