पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपमध्ये गेलेले नेते घरवापसीच्या तयारीत – अजित पवार  

0
878

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – भाजप सरकारच्या कारभारावर समाजातील प्रत्येक वर्ग आणि प्रशासनातील अधिकारीही नाराज आहेत.  आता पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपत कोंडी झालेले लोकही बोलायला सुरुवात करतील.  काही लोक भाजपमध्ये गेली, त्यांना गेल्या चार – साडे चार वर्षांमध्ये वापरण्यात आले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अपेक्षित वागणूक दिली नाही. ती लोक आता बोलू शकतात.  आतापर्यंत  त्यांना बोलायची सोय नव्हती. मात्र, आता ते भाजपविरोधात बोलू शकतात, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.   

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी झाली. या पाच राज्यात भाजपला जनतेने साफ धुडकावून लावले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपतून नेते राष्ट्रवादीत येणार का?, या प्रश्नावर  उत्तर देताना अजित पवार बोलत होते.

गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा स्वगृही परतण्याची चिन्हे आहेत. मराठवाडा आणि खान्देश या पट्ट्यातील नेते स्वगृही परतण्याची चर्चाही सुरू झाली आहे, असे पवारांनी सांगितले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपची सत्ता काँग्रेसने हिसकावून घेतली आहे. त्याधी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव, कर्नाटकमधील सत्ताबदल आणि गुजरातमध्ये भाजपचा निसटता विजय यामुळे भाजपसोबत गेलेले नेतेही सावध झाले आहेत, असेही पवार यांनी म्हटले आहे.