पाच राज्यांचे निकाल २०१९ च्या निवडणुकीसाठी चिंताजनक; खासदार काकडेंचा भाजपला घरचा आहेर  

0
1275

पुणे, दि. ११ (पीसीबी) – राजस्थान आणि छत्तीसगडमधून  भाजप सत्तेतून पायउतार होईल, असा माझा अंदाज होता. मात्र, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने मारलेली मुसंडी लक्षात घेता  आगामी २०१९ च्या निवडणुकीत भाजपसाठी चिंताजनक परिस्थिती आहे, असा घरचा आहेर भाजपचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी दिला आहे.  

काकडे म्हणाले की, भाजपने विकासाचा मुद्दा सोडून  राम मंदिर, शहरांचे नामकरण, हनुमानाची जात काढणे असे मुद्दे पुढे केले.  त्याचा मतदारांवर नकारात्मक परिणाम झाला. राजस्थानमध्ये निवडणुकीआधी केलेल्या सर्वेक्षणात तेथील सरकारबद्दल नाराजी दिसून आली होती. मात्र,  मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस २५ जागांवरून शंभऱच्या पुढे जाईल, असे वाटले नव्हते. या राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाळे असून बूथपर्यंत भाजपची यंत्रणा आहे. तसेच चौहान सरकारबद्दल सहानुभूती होती. तरीही जनतेने काँग्रेसला दिलेला पाठिंबा महत्त्वाचा आहे, असे काकडे म्हणाले.