पाच महिन्यांत २६ खून, ५ खून प्रकरणात कसलाच धागेदोरा नाही

0
292

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आता किरकोळ आणि गंभीर अशा प्रत्येक गुन्ह्याची सक्तीने नोंद होते असल्याने आता गुन्हेगारीचा आलेख वाढल्यासारखे चित्र आहे. गुन्हेगारांना बऱ्यापैकी चाप लावण्यात पोलिसांना यश आले, मात्र रोज वाढणारे गुन्हे हा आता चिंतेचा विषय झाला आहे. मागील पाच महिन्यात एकूण २६ खून झाले आहेत. यातील बहुतांश प्रकरणात आरोपींची नावे निष्पन्न असल्याने गुन्ह्यांची झटपट उकल करण्यात आली. मात्र, किचकट असणाऱ्या ५ खुन प्रकरणात पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागले नाहीत. या गुन्ह्याच्या तपासात स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखाही भरकटल्याचे चित्र आहे. त्यामुळे मास्टरमाईंड गुन्हेगारांसमोर पोलिस यंत्रणा हतबल झाल्याचे बोलले जात आहे.

देहूरोड –
तरुणाचा गुप्तांगावर वार करून खून
देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत २८ फेब्रुवारी २०२१ रोजी एका अनोखळी तरुणाचा मृतदेह मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता तरुणाच्या शरीरावर असंख्य वार करण्यात आले होते. विशेष म्हणजे आरोपीने चवताळून तरुणाच्या गुप्तांगावर देखील वार केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे सुरुवातीला हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. मात्र, या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांच्या हाती एकही धागा मिळाला नाही.

हिंजवडी –
मजुराचा मारेकरी कोण ?
हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुंबई- बंगळूर महामार्गावर ५ मार्च २०२१ रोजी एका मजुराचा मृतदेह मिळून आला. पोलिसांनी पाहणी केली असता मजुराच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी रुपेश मधुकर प्रधान (२९, रा. मिलिंदनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात सर्व शक्यता गृहीत धरून तपास केला. मात्र, अद्याप या प्रकरणाचे गूढ कायम आहे.

एमआयडीसी भोसरी –
‘त्या’ अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे काय ?
एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोशी प्राधिकरण येथे १८ फेब्रुवारी रोजी एका अनोळखी पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. पोलिस तपासात मयताच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याचे समोर आले. मात्र, अजूनही या गुन्हयात तपासाची डिश निश्चित झाली नाही.

चिंचवड –
पोलिसांची ‘आधार’ मिळवण्यासाठी धडपड
चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ फेब्रुवारी २०२१ रोजी एका तरुणाचा गळा चिरलेला मृतदेह मिळून आला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न केले. मयताच्या बोटाचे ठसे मिळवल्यानंतर त्याद्वारे आधारकार्ड मिळववण्यासाठी पोलिसांनी पत्रव्यवहार केला. मात्र, संबंधित विभागाने खासगी माहिती देण्यास नकार दिला. त्यानंतरही पोलिसांना आधार कार्ड हा एकमेव मार्ग दिसत असल्याने पोलिस त्यासाठी धडपड करीत आहेत.

तळेगाव दाभाडे –
मृताच्या गळ्यावर पन्नास पैशांची नाणी
तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गहुंजे स्टेडियम जवळ ८ फेब्रुवारी २०२१ रोजी एका तरुणाचा रक्तभंबाळ अवस्थेतील मृतदेह मिळून आला. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पोलिसही अवाक झाले. तरुणाचे डोके दगडाने ठेचले होते. तसेच, गळ्यावर ५० पैशांची नाणी ठेवण्यात आली होती. त्यामुळे अंधश्रद्धेतून हा प्रकार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पोलिसांनी त्या अनुषंगाने देखील तपास केला. मात्र, अद्याप आरोपींचा मागमूस लागला नाही.

आत्तापर्यंत ११ खून प्रकरणांचा तपास भरकटला
ऑगस्ट २०१८ मध्ये पिंपरी- चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतरच्या अडीच वर्षात झालेल्या सहा खून प्रकरणांचा पोलिस छडा लावू शकले नाहीत. यामध्ये देहूरोड- १, तळेगाव दाभाडे- २, तळेगाव एमआयडीसी- १, वाकड- १ , पिंपरी- १ अशा एकूण ६ गुन्ह्यांचा समावेश आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना सन २०२१ च्या पहिल्याच पाच महिन्यात आणखी पाच खूनात पोलिस अनुत्तरित आहेत. अशा एकूण ११ खून प्रकरणात पोलिसांनी गुढगे टेकल्याचे चित्र आहे.
उकल न झालेल्या गुन्हयांपैकी काही गुन्ह्यांचा तपास प्रगतीपथावर आहे. उर्वरित गुन्ह्यांचा तपासाबाबत प्रत्येक बैठकीत आढावा घेऊन सूचना दिल्या जातात. आगामी काळात यातील काही गुन्ह्यांची उकल होईल, असे पोलिस उपायुक्त
डॉ.सुधीर हिरेमठ यांनी सांगितले.