पाच कोटींचे कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने भोसरीतील एकाची सव्वा दोन लाखांची फसवणूक

0
838

भोसरी, दि. ३१ (पीसीबी) – पाच कोटी रुपयांचे कर्ज मंजुर करुन देतो असे सांगून एकाची प्रोसेसिंग फीच्या नावाखाली २ लाख २० हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक ऑगस्ट २०१७ ते ३० ऑगस्ट २०१८ दरम्यान लक्ष्य एंटरप्राईजेस, केसरीवाडा, पुणे आणि दापोडी येथे करण्यात आली.

रेवराज देवनाथ तिघेरे (वय ४२, रा. मातोश्री क्लासिक बिल्डींग, फ्लॅट नं.९, दिघी रोड, भोसरी)असे फसवणुक झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार अब्दुल सैय्यद (रा. दापोडी) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेवराज तिघेरे यांना ऑगस्ट २०१७ मध्ये पाच कोटी रुपयांचे कर्ज घ्यायचे होते. यामुळे तिघेरे हे आरोपी अब्दुल सैय्यद याच्याकडे गेले होते. अब्दुल यांने तिघेरे यांना पाच कोटीचे कर्ज हवे असल्यास २ लाख प्रोसेसिंग फी आणि २० हजार रुपये वकिलाची फी असे २ लाख २० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. यामुळे तिघेरे यांनी अब्दुल याला २ लाख २० हजार रुपये दिले. मात्र बरेच दिवस उलटून गेल्याने अब्दुलने तिघेरे यांना पाच कोटींचे कर्ज मिळवून दिले नाही. तसेच दिलेली २ लाख २० हजारांची रक्कम  एक वर्ष उलटून गेले तरी परत केली नाही. यामुळे तिघेरे यांनी सर्व प्रथम भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने तो पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.