पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना महात्मा फुले विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकाला अटक

0
622

पुणे, दि. ७ (पीसीबी) – पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना महात्मा फुले विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे. ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.

सुनील लक्ष्मण काची (वय ४४, वर्ग २ जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, पुणे, रा. पिंपळे गुरव) लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २९ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका २९ वर्षीय तक्रारदाराच्या आजोबांनी महात्मा फुले विकास महामंडळाकडून कर्ज घेतले होते. त्याची नोंद तक्रारदार यांच्या ७/१२ उताऱ्यावर होती. राज्य सरकारने महामंडळाकडून घेतलेली सर्व कर्जे माफ केली आहेत. म्हणून तक्रारदाराने ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी महामंडळाकडे अर्ज केला होता. त्याबाबत महामंडळाकडून तक्रारदाराला दाखलाही देण्यात आला होता. मात्र देण्यात आलेल्या दाखल्यावर रक्कमेचा उल्लेख नव्हता. त्या दाखल्यामध्ये रक्कमेचा उल्लेख करून दाखला घेण्यासाठी वर्ग दोन जिल्हा व्यवस्थापक सुनील काची यांनी तक्रारदाराकडे पाचशे रुपयाची लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे च्या अधिकाऱ्यांनी काची यांना रंगेहाथ  अटक केली. यावेळी उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक एस एस घार्गे उपस्थित होते.