पाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार?; शाहीद आफ्रिदीचा घरचा आहेर

0
795

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – पाकिस्तानला देशातील नागरिकांना सांभाळता येत नाही, ते काश्मीर काय सांभाळणार?’, असा घरचा आहेर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने पाक सरकारला दिला आहे. यामुळे आफ्रिदी अडचणीत येण्याची शक्यता आहे. आफ्रिदीचा पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात त्यांने हे विधान केले आहे.  

पाकिस्तानला पाकिस्तानी नागरिकांना सांभाळताना नाकात दम आला आहे. ते काश्मीरला काय सांभाळतील, असा सवाल आफ्रिदीने या व्हिडिओमध्ये केला आहे. पाकिस्तानला काश्मीर नको आहे. भारतालाही काश्मीर देऊ नका. काश्मीर स्वतंत्र देश व्हावा. कमीत कमी माणूसकी तरी जीवंत राहील. लोक मरत आहेत. ते तर थांबेल, असेही आफ्रिदी म्हणाला.

दरम्यान, एप्रिल २०१८मध्ये भारतीय जवानांनी १३ अतिरेक्यांना  ठार केले होते. त्यावर आफ्रिदीने ट्विट करत म्हटले होते की,  काश्मीरची स्थिती चिंताजनक आहे. स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठी दमनकारी सरकारकडून निर्दोष लोकांना मारले जात आहे. संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना आहेत कुठे? हा रक्तपात रोखण्यासाठी ते काहीच का करत नाहीत?’, असा सवाल आफ्रिदीने केला होता.