Maharashtra

पाकिस्तानी गायकांची गाणी थांबवा; अन्यथा ‘सर्जिकल स्ट्राइक’; मनसेचा एफएम वाहिन्यांना इशारा

By PCB Author

February 18, 2019

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – पाकिस्तानी गायक- संगीतकारांची गाणी थांबवा, अन्यथा  गाणी बंद करण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राइक’कसा करायचा, हे मनसेला ठाऊक आहेच, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी एफएम रेडिओ वाहिन्यांना दिला आहे.

भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका कधी उडेल, काही सांगता येत नाही. अशा स्फोटक वातावरणात आपल्या रेडिओ वाहिन्या मात्र नुसरत फतेह अली खान, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली झफर, सज्जाद अली, गुलाम अली, रेश्मा, सफाकत अमानत अली यासारख्या गायक, संगीतकारांची गाणी  एफएम रेडिओ वाहिन्यांवर सुरू आहेत.

यासंदर्भात शालिनी ठाकरे यांनी आज (सोमवार) सर्व एफएम वाहिन्यांना पत्र पाठवले आहे. यात त्या म्हणतात, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा सूड घेण्यासाठी एक देश म्हणून आपण सर्व भारतीय वचनबद्ध असताना आपल्या लोकप्रिय रेडिओ वाहिनीवर मात्र अत्यंत निर्लज्जपणे पाकिस्तानी गायक -संगीतकारांची गाणी वाजवली जात आहेत.

पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी मात्र देशवासीयांच्या मनात संतापाची भावना निर्माण करत आहेत. म्हणूनच रेडिओ वाहिन्यांवर पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी वाजवली जाऊ नयेत, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे, असे या पत्रात म्हटले आहे.