पाकिस्तानातील `इम्रानशाही` अखेर संपली

0
361

इस्लामाबाद, दि. १० (पीसीबी) : सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांचा सभात्याग, सभात्यागावेळी सत्ताधारी व विरोधीपक्षांच्या सदस्यांमध्ये सभागृहातच झालेली हाणामारी आणि शनिवारी मध्यरात्री अविश्वास ठरावावर झालेले मतदान अशा नाट्यमय घडामोडींनंतर पाकिस्तानातील `इम्रानशाही` अखेर खालसा झाली. अविश्वास ठरावाच्या बाजूने १७४ मते मिळाली, तर विरोधात शून्य मते मिळाली. अशा प्रकारे पदावरून हटविले जाणारे इम्रान हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

यांना सत्ताच्युत करण्यासाठी ३४२ सदस्यांच्या सभागृहामध्ये विरोधकांना १७२ सदस्यांचे बळ आवश्यक होते. विरोधकांना इम्रान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिके- इन्साफ’ या पक्षाचे मित्र असणाऱ्यांचाही पाठिंबा मिळाला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सत्तेचा गेम खेळण्याचा निर्धार करत मैदानात उतरलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज विरोधकांना अक्षरशः दिवसभर झुलविले. परंतु, ते दिवसभरात नॅशनल असेंब्लीत फिरकलेच नाहीत. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावरील मतदानाला बगल देत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवरच कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. इम्रान यांनी राजीनामा द्यावा म्हणून ‘आयएसआय’ आणि लष्करानेही दबाव आणला होता पण शनिवारी रात्री झालेल्या बैठकीत इम्रान यांनी हा दबाव झुगारून लावत पंतप्रधानपदाचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला.