पाकिस्तानच्या हवाई हद्दीत एफ-१६ ने भारताच्या विमानाला दिले संरक्षण   

0
822

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – पाकिस्तानी एअर फोर्सच्या फायटर विमानांनी नवी दिल्लीहून काबूलला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचा मार्ग २३ सप्टेंबरला रोखला होता.  पाकिस्तानी एअर फोर्सच्या फायटर विमानांनी स्पाइसजेटचे विमान उड्डाणवस्थेत असताना  इंटरसेप्ट केले. नंतर पाकिस्तानच्या हवाई हद्दीबाहेर जाईपर्यंत स्पाइसजेटच्या त्या विमानाला संरक्षणही दिले, अशी माहिती  नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) सूत्रांनी  दिली.

स्पाइसजेटच्या बोईंग ७३७ विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर कॉल साइनवरुन गोंधळ निर्माण झाला. पाकिस्तानी एअर फोर्सने स्पाइसजेटच्या विमानाला उड्डाणाची उंची कमी करण्यास सांगितले तसेच एफ-१६ विमाने स्पाइस जेटच्या दिशेने झेपावली होती. स्पाइसजेटच्या वैमानिकाने पाकिस्तानी एअर फोर्सच्या वैमानिकांबरोबर संवाद साधला व व्यावसायिक विमान असल्याची माहिती दिली.

पाकिस्तानी वैमानिकांची खात्री पटल्यानंतर स्पाइसजेटच्या विमानाला अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करेपर्यंत संरक्षण देण्यात आले.  हा संवेदनशील विषय असल्याने डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी आणखी माहिती देण्यास नकार दिला. स्पाइस जेटने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.