Videsh

पाकिस्तानच्या लष्कराने आणि जनतेने कोणत्याही परिस्थितीसाठी तयार रहावे – इम्रान खान

By PCB Author

February 26, 2019

इस्लामाबाद, दि. २६ (पीसीबी) – भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या लष्कराने आणि जनतेने कोणत्याही परिस्थितीसाठी धैर्याने तयार रहावे, असे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कर प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीनंतर खान यांनी पत्रकार परिषदेत असे वक्तव्य केले.

भारताच्या वायु दलाने आज पहाटे ३.३० वाजता नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमधील बालाकोटवर हवाई हल्ला केला. यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळांना उद्ध्वस्त करुन २५०ते३०० दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा भारताच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही तळ उद्ध्वस्त झाले नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. बैठक झाल्यानंतर इम्रान खान यांनी पाकच्या जनतेला सतर्क असण्याचे आवाहन केले. पुढील घटनाक्रमासाठी देशातील जनतेने आणि लष्कराने तयार असावे, असे त्यानी म्हटले. तर, भारताला या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर दिले जाणार, अशी धमकी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने दिली आहे.