पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवणे पाकिस्तानच्या हिताचे – रामदास आठवले

0
390

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – “पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानने भारताला सोपवणे हे पाकिस्तानच्या हिताचे आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेला पाकिस्तानसोबत रहायचे नाही, हे अनेक वृत्तांमधून समोर आले आहे. जर पाकिस्तानला युद्ध नको असेल आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या हिताचा विचार असेल तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा,” असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. ते चंदीगडमध्ये बोलत होते.

“पाकव्याप्त काश्मीरच्या जनतेला पाकिस्तानसोबत रहायचे नाही. त्यांना भारतात येण्याची इच्छा आहे. गेल्या ७० वर्षांपासून पाकिस्तानने काश्मीरचा एक तृतीयांश भाग गिळंकृत केला आहे. हे गंभीर प्रकरण आहे,” असे आठवले यावेळी म्हणाले. आपल्या खात्याच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांचीही स्तुती केली. “नरेद्र मोदी हे ऊर्जावान पंतप्रधान आहेत. कलम ३७० रद्द करण्याचा त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. पाकिस्तानने अनेकदा काश्मीरचा मुद्दा उचलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानने आता पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवला पाहिजे आणि ते पाकिस्तानच्या हिताचे असेल,” असे आठवले म्हणाले.

“पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर भारताकडे सोपवल्यास आम्ही त्या ठिकाणी अनेक उद्योगधंदे उभारू. तसंच पाकिस्तानलाही व्यापारात मदत करू. याव्यतिरिक्त भारत त्यांना गरीबी आणि बेरोजगारीशीही लढण्यास मदत करेल,” असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी हरियाणामध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकांवरही भाष्य केलं. आपला पक्ष ९० पैकी १० जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. तसेच आम्ही काँग्रेसच्या विरोधात लढणार असल्याचे ते म्हणाले.