पाकमध्ये सत्तापालट; इम्रान खान पंतप्रधानपदी निश्चित

0
907

इस्लामाबाद, दि. २६ (पीसीबी) – पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान ‘तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाने सर्वाधिक जागा पटकावून आघाडी घेतल्याने पाकमध्ये सत्तापालट निश्चित मानला जात आहे. त्यामुळे पाकिस्तानची पुढची सूत्रे इम्रान खान यांच्या हातात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीच्या एकूण ३४२ पैकी २७२ जागांसाठी झालेल्या मतदानात इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक ११३ जागा मिळाल्या आहेत. इम्रान खान यांचा पक्ष बहुमतापासून अवघ्या २४ जागांनी दूर असून आणखी काही जागांचे निकाल यायचे बाकी असल्याने इम्रान खान बहुमताचा आकडा गाठतील अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या निवडणुकीत माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाला अवघ्या ६४ जागा मिळाल्याने शरीफ यांना मोठा धक्का बसला आहे. तर बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला ४३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर एमक्यूएमला ५ आणि एमएमएला अवघ्या ९ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत पाकिस्तानी जनतेने अनेक दिग्गजांना घरचा रस्ता दाखवला आहे.