पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव; भारताला मालिकेत १-० अशी आघाडी

0
627

अॅडलेड, दि. १० (पीसीबी) – येथील पहिल्या कसोटीत भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव केला. भारताने विजयासाठी ३२३ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना २९१ धावांपर्यंत मजल मारता आली. अष्टपैलू पॅट कमिन्स आणि कर्णधार टीम पेन यांनी खेळपट्टीवर ठाण मांडून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. भारताच्या वेगवान माऱ्यासमोर कांगारुं तग धरू शकले नाहीत. या विजयामुळे भारताने ४ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ४ बाद १०४ या धावसंख्येवरुन अंतिम दिवसाचा खेळ सुरु झाला. पहिल्याच सत्रात ट्रेव्हिस हेड (१४) लगेचच बाद झाला. अर्धशतकी खेळी करून शॉन मार्शही (६०) माघारी परतला. त्यानंतर खेळात उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने  झुंज सुरु ठेवली. उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने ६ गडी गमावत १८६ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. टीम पेनला (४१) बुमराहने तंबूत धाडले. शमीने स्टार्कला (२८) तंबूचा रस्ता दाखवला. दीर्घकाळ खेळपट्टीवर तग धरून खेळणाऱ्या पॅट कमिन्सची झुंज अखेर अपयशी ठरली. १२१ चेंडूत २८ करून तो बाद झाला. बुमराहने त्याचा अडसर दूर केला.

भारताकडून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी अर्धशतके ठोकली आणि भारताला समाधानकारक आघाडी मिळवून दिली. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे जोडीने भारताच्या खात्यात धावसंख्येची भर घालत डावाला आकार दिला. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही झाली. पुजाराने ७१ तर रहाणेने ७० धावा केल्या. लॉयनच्या ६ गड्यांव्यतिरिक्त स्टार्कने ३ तर हेजलवूडने १ गडी माघारी धाडला.