पहिल्याच दिवशी लोकसभेत पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गदारोळ

0
255

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या मंत्र्यांची ओळख करुन देण्यासाठी उभे राहिले होते. विरोधकांकडून यावेळी गदारोळ घातला जात असल्याने मोदींनी त्यांच्यावर निशाणा साधला. इतक्या महिला, दलित आणि आदिवासींना मंत्री बनवण्यात आल्यानंतर संसदेत उत्साह असेल असं मला वाटलं होतं असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

“मला वाटलं होतं की, इतक्या महिला, दलित, आदिवासी मंत्री झाल्याने संसदेत उत्साह असेल. यावेळी कृषी, ग्रामीण, ओबीसी समाजातील सहकाऱ्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं आहे. पण काही लोक महिला, ओबीसी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मंत्री होण्याची संधी दिल्याने आनंदी नाहीत. यामुळे त्यांची ओळख करुन देण्याची परवानगी ते देत नाही आहेत,” असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना हे संसदेच्या परंपरेला धरुन नसल्याचं सांगत संताप व्यक्त केला. चांगल्या पंरपरा तोडल्या जात आहेत. सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या संसदेत हे वागणं योग्य नाही असं त्यांनी विरोधकांना सुनावलं.

“करोनाने सर्व जगावर आणि मानवजातीवर प्रभाव पडला आहे. त्यामुळे या महामारीवर संसदेत चर्चा व्हायला हवी आणि या मुद्यावर प्राथमिकपणे चर्चा करायला हवी. तसेच सर्व सदस्यांकडून यावरील सूचना सूचना मिळाव्यात, जेणेकरून कोविडविरूद्ध लढा देण्यासाठी एक नवीन दृष्टिकोन मिळू शकेल आणि उणीवा दूर होऊन एकत्रित वाटचाल करु. मी सर्व खासदारांना आणि सर्व पक्षांना सभागृहात अत्यंत कठीण आणि तीव्र प्रश्न उपस्थित करण्याची विनंती करतो. पण त्याचसोबत उत्तर देण्यासाठी सरकारला शिस्तबद्ध वातावरणात वेळ द्यावा. यामुळे लोकशाहीला चालना मिळेल आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही बळकट होईल” असे मोदी यांनी म्हटलं.