…पहा सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती मते मिळाली  

0
786

सांगली, दि. ४ (पीसीबी) –  सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका  स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजपने काँग्रेसच्या ताब्यातील महापालिकेची सत्ता खेचून घेतली. या निवडणुकीत  ४१ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. भाजपला ३५.१४ टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसला २०.७० टक्के तर राष्ट्रवादीला १५.६० टक्के मते मिळाली आहेत. अपक्षांनी सुमारे १६.३० टक्के मते घेतल्याने निवडणूक निकाल अनपेक्षितपणे लागला. काँग्रेस, राष्ट्रवादीला बंडखोरीचा मोठा फटका बसला आहे. अपक्षांनी लक्षणीय  मते घेतल्याने काँग्रेस –राष्ट्रवादीला बहुमताचा आकडा गाठता आला नाही.   

महापालिका निवडणुकीसाठी ४ लाख २४ हजार १७९ मतदार होते. त्यापैकी २ लाख ६३ हजार ७३२ मतदारांनी मतदान  केले. १८ प्रभागात प्रत्येकी ४ उमेदवार, तर २ प्रभागात प्रत्येकी ३ असे एकूण २० प्रभागात ७८ उमेदवार निवडून द्यायचे होते. १८ प्रभागात एका मतदाराला ४, तर २ प्रभागात एका मतदाराला ३ मते द्यायची होती. मतदान केलेल्या २ लाख ६३ हजार ७३२ मतदारांची १० लाख ३३ हजार ३९५ मते वैध ठरली.

वैध १० लाख ३३ हजार ८९५ मतांपैकी भाजपला ३ लाख ६३ हजार ९३ मते पडली.  मतांचे हे प्रमाण ३५.१४ टक्के आहे. काँग्रेसला २ लाख १३ हजार ८७७ मते मिळाली. हे प्रमाण २०.७० टक्के आहे. राष्ट्रवादीला १ लाख ६१ हजार २८ मते (१५.६० टक्के) मिळाली आहेत. अपक्षांना १ लाख ६८ हजार ४६१ मते (१६.३० टक्के) मिळाली आहेत.

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी  केली होती. त्यामुळे दोन्ही पक्षातील नाराजावर  भाजपने लक्ष केंद्रीत केले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची यादी गोपनीय ठेवली होती. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीतील नाराज भाजपच्या गळाला  लागले नाहीत. मात्र, उमेदवारी न मिळालेल्या बहुसंख्य नाराजांनी बंडखोरी केल्याने  आघाडीच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे राहिले.

काँग्रेस बंडखोर उमेदवार गजानन मगदूम यांना एकमेव अपक्ष उमेदवार म्हणून विजय  नोंदवता आला.  त्याचबरोबर इतर  काही अपक्षांनी लक्षणीय मते घेतली. एकूण अपक्षांची मते १ लाख ६८  हजार ४६१ आहेत. त्यांच्या मतांचा टक्का१६.३०  इतका आहे.