पहाटेच्या ‘त्या’ शपथविधीची जयंत पाटील यांनाही खंत

0
210

मुंबई, दि. १० (पीसीबी) – राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन दीड वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असला तरी अद्यापही राज्याच्या राजकारणात अजित पवार आणि फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीवरुन चर्चा सुरु असते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेते त्या शपथविधीवरुन अजित पवारांवर निशाण साधताना दिसतात. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील त्या शपथविधीमुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम झाल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपला २२ वा वर्धापन दिन साजरा करत असून यानिमित्ताने ते एबीपी माझाशी बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाचा प्रवास उलगडताना भविष्यातील वाटचालीबद्दलही सांगितलं.

पहाटेच्या शपथविधीचा प्रतिमेवर परिणाम
“ज्यावेळी ही घटना झाली तेव्हा फार मतांतरं होती आणि प्रतिमेवर काहीसा परिणाम झाला. पण त्यानंतर पक्षातील नेते आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या मागे उभे राहिले. अजित पवारही आज एकत्रितपणे काम करत आहेत. मागचं सगळं विसरुन सगळे एकत्र काम करत आहोत. ज्या घटना घडल्या त्यावर मात करुन एकजीवानीशी काम केलं जात आहे,” असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

…त्यावेळी मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर परिस्थिती चांगली असती; जयंत पाटील यांनी व्यक्त केली खंत
राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद न मिळाल्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, “राजकीय परिस्थितीप्रमाणे तडजोड करणं आवश्यक असतं. २००४ मध्ये राष्ट्रवादीला ७२ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळूनही मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचा निर्णय आम्ही त्यावेळी घेतला. त्यावेळी आम्ही मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर परिस्थिती चांगली झाली असती असं आजही वाटतं”.

“चंद्रकात पाटील यांच्याबद्दल आदर आणि आपुलकी आहे. आमच्या कोल्हापूरचे असल्याने जिव्हाळ्याची आपुलकी आहे. आम्हा कोल्हापूर, सांगलीकरांना सोडून ते पुण्याला गेले याचा मनात थोडासा रागही आहे. कोल्हापूरला न थांबता पुण्याला जाणं हे कोल्हापूरकर आणि पुणेकर दोघांनाही आवडलेलं नाही. आमचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. पण त्यांनी असं करायला नको होतं,” असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

“झोपेतही सरकार बदलले असं ते म्हणाले आहेत. पक्षातील कार्यकर्ते टीकावेत म्हणून ते असं बोलत असतात. मी त्यांना नाही तर परिस्थितीला दोष देतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून तिकडे गेलेल्यांना धीर धरावा म्हणून ते १५ दिवसांनी सरकार येणार असं वक्तव्य करत असता. दीड वर्षांपासून ते घोषणा करत असून त्यापेक्षा विरोधी पक्ष म्हणून काम केलं पाहिजे. कुठेच लक्ष दिलं जात नसल्याने सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम केलं तर सरकारलाही फायदाही होईल आणि त्यांचा नावलौकिकही वाढेल,” असा सल्ला जयंत पाटील यांनी यावेळी दिला.