Pune

पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीजचोरी विरोधात मोहीम आणखी तीव्र करा; पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांचे निर्देश

By PCB Author

December 09, 2020

पुणे, दि.9 (पीसीबी) : वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासोबतच सर्व वीजग्राहकांना योग्य दाबाच्या वीजपुरवठ्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील वीजचोरीविरुद्धची मोहीम आणखी तीव्र करण्यात यावी तसेच रब्बी हंगामामध्ये कृषिपंपांना योग्य दाबाने सुरळीत वीजपुरवठ्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करावी असे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी दिले.

पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. नाळे यांनी मंगळवारी (दि. 8) व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेतला. यावेळी ते बोलत होते. मुख्य अभियंता सर्वश्री सचिन तालेवार (पुणे), सुनील पावडे (बारामती) व प्रभाकर निर्मळे (कोल्हापूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.

वीजबिलांचा भरणा होत नसल्याने महावितरण सध्या आर्थिक संकटात आहे. त्यामुळे थेट वीजग्राहकांशी संवाद साधून त्यांना वीजबिल भरण्याची विनंती करण्यात यावी. कोरोनाच्या लॉकडाऊन कालावधीतील वीजबिलांबाबत शंका किंवा तक्रारी असल्यास त्याचे देखील तात्काळ निवारण करण्यात यावे असे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. नाळे यांनी सांगितले. यासोबतच प्रत्येक विभागनिहाय वितरण व वाणिज्यिक हानी आणखी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध मोहीम तीव्र करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ज्या वीजवाहिन्यांवर हानीचे प्रमाणे अधिक दिसून येत आहे त्या वाहिन्यांवरील सर्व वीजजोडण्यांची तात्काळ तपासणी सुरु करण्यात यावी. अनधिकृत वीजजोडण्या काढून टाकण्यासोबतच संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आवश्यक तेथे महावितरणच्या भरारी पथकांसह पोलिस विभागाचे देखील सहकार्य घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रात शेतीसाठी रब्बी हंगाम महत्वाचा असल्याने कृषिपंपांना योग्य दाबाने सुरळीत वीजपुरवठा करावा. त्यासाठी येत्या 31 डिसेंबरपर्यंत कृषिपंपांसह संबंधीत रोहित्रांचे सर्वेक्षण करून अनधिकृत वीजजोडण्या काढून टाकण्याची मोहीम पूर्ण करावी. या दरम्यान रोहित्रांची क्षमता वाढविणे आवश्यक असल्यास त्याचे प्रस्ताव देखील तातडीने सादर करावे. सुरळीत वीजपुरवठा व रोहित्रावरील वीजभार कमी करण्यासाठी उपयुक्त असलेले कॅपॅसिटर योग्य क्षमतेनुसार कृषिपंपांना बसविण्याचे आवाहन यावेळी प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. नाळे यांनी केले. अभियंता व कर्मचाऱ्यांनी कृषिपंपांना कॅपॅसिटर बसविण्याबाबत शेतकऱ्यांना माहीती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. कृषिपंपांचे रोहित्र नादुरुस्त झाल्यास दुरुस्तीची किंवा बदलण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. पुरेशा प्रमाणात रोहित्र व ऑईल उपलब्ध असून मागणीप्रमाणे पुरविण्यात येत आहे. त्यामुळे नादुरुस्त रोहित्र किंवा इतर तांत्रिक कारणांनी वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्यास संबंधीत जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. नाळे यांनी सांगितले.

या आढावा बैठकीमध्ये महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. अलोक गांगुर्डे, प्रादेशिक विभागातील सर्व अधीक्षक अभियंते व कार्यकारी अभियंते तसेच वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.