silhouette of high voltage electric tower with beautiful twilight background

Maharashtra

पश्चिम महाराष्ट्रात ७ हजारांवर आकडे जप्त….

By PCB Author

April 26, 2022

पुणे, दि. २६ (पीसीबी): गेल्या चार दिवसांमध्ये महावितरणने वीजचोरी करणाऱ्या आकडेबहाद्दरांविरुद्ध विशेष मोहिमेद्वारे कठोर कारवाईला सुरवात केली आहे. यामध्ये पुणे, सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये अनधिकृत वीजजोडणीचे ७ हजार २२० आकडे काढून टाकण्यात आले असून त्यासाठी वापरलेले पंप, केबल व स्टार्टर आदी साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. आकडेमुक्त वीजवाहिन्यांसाठी ही कारवाई यापुढेही कायम ठेवण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी दिले आहे.

सध्या उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असल्याने विजेच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. मागणीप्रमाणे विजेचा पुरवठा करण्यासाठी हे अनधिकृत आकडे अडथळे ठरत असल्याने वीजचोरीविरुद्ध ही विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. यात गेल्या चार दिवसांमध्ये ७ हजार २२० ठिकाणी अनधिकृत आकडे टाकून वीजचोरी सुरु असल्याचे दिसून आले. हे आकडे तात्काळ काढून टाकण्यासोबतच त्यासाठी वापरण्यात आलेले केबल, पंप, स्टार्टर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या धडक कारवाईमध्ये आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये ३०२१, सातारा जिल्हा- ७०३, कोल्हापूर- ३५, सांगली- ४५७ आणि पुणे जिल्हा अंतर्गत पुणे ग्रामीण, गणेशखिंड, रास्तापेठ मंडलमध्ये ५७३ आणि बारामती ग्रामीण मंडलमध्ये २४३१ आकडे आढळून आले व ते ताबडतोब काढून टाकण्यात आले आहेत. यातील वीजचोरीचे बहुतांश आकडे हे कृषी वापरासाठी असल्याचे दिसून आले. या कारवाईमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा होणे, वीजवाहिनी किंवा रोहित्र अतिभारित होणे, रोहित्रामध्ये बिघाड होणे, विद्युत अपघात आदी प्रकार टाळले जात आहेत. अधिकृत वीजजोडणी घेतलेल्या ग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होत आहे. सोबतच विजेच्या वाढत्या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी ही कारवाई अतिशय पुरक ठरत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून वीजचोरीविरुद्ध नियमित कारवाईसह विशेष एक दिवसीय मोहीम सुरु करण्यात आली आहे. या विशेष मोहिमांमध्ये आतापर्यंत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये ६ हजार ४२८ ठिकाणी ७ कोटी ७१ लाख ४५ हजार रुपयांच्या अनधिकृत वीजवापराचा पर्दाफाश करण्यात आला आहे. इतर ठिकाणाहून आकडे किंवा केबल टाकून चोरीद्वारे वीज वापर करताना स्वतःच्या, घरातील लहानमोठ्या व्यक्तीच्या किंवा परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. जीवघेणा अपघाताची शक्यता असते. त्यामुळे विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.