पश्चिम बंगालमध्ये शाह ‘निती’ यशस्वी; १८ जागांवर भाजपाचा विजय

0
373

बंगाल, दि. २४ (पीसीबी) – पश्चिम बंगालमध्ये भाजपाला पहिल्यांदाच मोठा विजय मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत २ जागा जिंकणाऱ्या भाजपाने तब्बल १८ जागांवर विजय मिळवत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. दरम्यान, सर्व जागांवर विजय मिळवण्याची अपेक्षा करणाऱ्या तृणमूल काँग्रेसला केवळ २३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसच्या हाती केवळ एकच जागा आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या चाणक्य नितीचा फायदा भाजपाला झाल्याचे दिसत आहे.

निवडणुकीपूर्वीच केंद्रात पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असतानाच शाह यांनी पश्चिम बंगालकडेही आपला मोर्चा वळवला होता. त्यातच उत्तर प्रदेशातील सभांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक सभा पश्चिम बंगालमध्ये घेतल्या होत्या. तर अमित शाह यांनीदेखील ११ सभा घेतल्या होत्या. हिंदुत्व आणि घुसखोरीसारखे महत्त्वाचे मुद्दे भाजपाने उचलून धरले होते. तसेच ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जनता नाराज असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

अमित शाह यांनी लोकसभेच्या ५४३ जागांसाठी पक्षाकडून ६०० कार्यकर्त्यांना पूर्णवेळ कामासाठी नियुक्त केले होते. त्यापैकी ५४३ जणांवर लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच ज्या लोकसभेच्या जागांवर भाजपाचा जोर नाही अशा जागांसाठी ५-५ सुपरवायझरही नियुक्त करण्यात आले होते. तसेच साडेतीन लाख कार्यकर्त्यांनी एकत्रित दीन दयाल विस्तारक योजनेअंतर्गत पक्षाच्या सक्षमीकरणासाठी बूथ लेवलवर काम केले होते. तसेच ४ हजार कार्यकर्त्यांना सहा महिन्यांपासून एका वर्षापर्यंत पूर्ण वेळ वॉलेंटियर्स म्हणूनही काम सोपवण्यात आले होते.