Desh

पश्चिम बंगालमध्ये राजकीय मोठा भूकंप; तृणमूल काँग्रेसचे आमदार, खासदार राजीनाम्याच्या मोड मध्ये

By PCB Author

December 16, 2020

कोलकाता, दि. १६ (पीसीबी) – पश्चिम बंगालमध्ये नव्या वर्षात विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. मात्र, आतापासूनच राजकीय हादरे जाणवू लागले आहेत. बंगालच्या राजकारणात दबदबा असलेले आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानं बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, तृणमूलचे पाच खासदारही राजीनामा देऊन भाजप मध्ये प्रवेशाच्या तयारीत आहेत.

विधानसभा निवडणुकीमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण घुसळून निघालं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जोरात मोर्चबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीला अजून बराच अवकाश असला, तरी आतापासून राजकीय हादरे सुरू झाले आहेत. काही दिवसांपासून नाराज असलेले तृणमूलचे नेते सुवेंदू अधिकारी भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. आज आमदारकीचा राजीनामा देत अधिकारी यांनी खळबळ उडवून दिली आहे.

अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधीपासूनच सुवेंदू अधिकारी भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मंत्रिपदापाठोपाठ अधिकारी यांनी आमदारकीचाही राजीनामा दिल्यानं, ते भाजपा जाणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुढील काही दिवसात अधिकारी भाजपात दाखल होणार असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी नेत्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. अधिकारी यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपानं त्याचं स्वागत केलं आहे. त्याचबरोबर त्यांना भाजपात येण्याचंही आवाहनही केलं आहे.

‘पाच खासदार भाजपाच्या वाटेवर’ काही दिवसांपूर्वीच भाजपाचे खासदार अर्जून सिंह यांनी तृणमूल काँग्रेसचे पाच खासदार भाजपात येणार असल्याचा दावा केला होता. सौगत रॉय यांच्यासह पाच खासदार तृणमूलचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या नावाचाही उल्लेख केला होता.