पश्चिम बंगालमध्ये ‘रथयात्रे’ला परवानगी नाकारली; भाजपला उच्च न्यायालयाचा दणका   

0
721

कोलकाता, दि. ६ (पीसीबी) – पश्चिम बंगालमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजप आजपासून (गुरूवार) लोकशाही बचाव  ‘रथयात्रा’ काढणार होते. मात्र, या रथयात्रेला  उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जानेवारी रोजी होणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

रथ यात्रेमुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. जातीच्या आधारावर फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे पश्चिम बंगाल सरकारने न्यायालयात सांगितले होते. यावर रथ यात्रा शांततेत पार पडेल असे भाजपचे वकील अनिंद्या मित्रा म्हणाले होते. मात्र, जर जातीय तेढ अथवा दंगली झाल्यास त्याला जबाबदार कोण राहील असा प्रश्न न्यायालयाने विचारला होता. यावर कायदा आणि सुव्यवस्था पाळणे राज्य सरकारची जबाबदारी आहे, असे अनिंद्या मित्रा यांनी  म्हटले. त्यानंतर न्यायालयाने परवानगी देण्यास नकार दिला.

यापूर्वी   बुधवारी  रथ यात्रेला परवानगी मिळावी यासाठी भाजपाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. रथयात्रेची परवानगी घेण्यासाठी आतापर्यंत पोलीस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक, गृहसचिव यांना निवेदने देण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून आतापर्यंत कोणताही प्रतिसाद आलेला नाही. अखेर भाजपने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.