Desh

पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभेचा मंडप कोसळला

By PCB Author

July 16, 2018

कोलकाता, दि. १६ (पीसीबी) – मिदनापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरु असताना अचानक मांडव कोसळल्याची घटना घडली आहे. यावेळी कोणालाही दुखापत झालेली नाही. या सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. एका मांडवावर ताण आला आणि तो मांडव खाली कोसळल्याचे सांगितले जात आहे.  

पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या भाषणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कडाडून टीका केली. मात्र त्यांचे भाषण सुरू असतानाच लोकांची गर्दी वाढल्याने मांडव कोसळल्याची घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असतानाच ही घटना घडली. या घटनेनंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले भाषण सुरूच ठेवले आणि ममता बॅनर्जींवर निशाणा साधला.