पवार यांच्या भेटीमागे दडलय काय

0
318

मुंबई, दि. २५ (पीसीबी) : गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू ठरत असलेल्या राजभवनावर देशाच्या राजकारणातील दिग्गज नेते शरद पवार गेले होते. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती यावेळी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (सोमवार) सकाळी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी प्रफुल्ल पटेलही त्यांच्यासोबत होते. भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपालपदी नेमणूक झाल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत ही पहिलीच सदिच्छा भेट होती.

शरद पवार राज्यपालांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. कोश्यारी, पवार आणि पटेल यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. “कोश्यारींनी चहासाठी बोलावलं होतं. ही केवळ सदिच्छा भेट होती, भेटीमागे राजकीय निष्कर्ष काढण्याची गरज नाही, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही” अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी राजभवनातून निघताना दिली.

उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेच्या आमदारपदी वर्णी लागल्याने महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. विधीमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहात मुख्यमंत्र्यांची वर्णी लागेपर्यंत तिन्ही पक्षातील नेत्यांचा जीव टांगणीला लागला होता. दरम्यानच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजभवनातील फेऱ्या वाढल्याने ठाकरे मंत्रीमंडळाची धाकधूक वाढली होती.