पवार कुटुंबात सर्वकाही आलबेल; सुप्रिया सुळेंनी केला फॅमिली फोटो शेअर

0
598

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची मावळमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावरुन जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार  नाराज आहेत. तसेच पवार कुटुंबीयांमध्ये कलह सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोला  “फन टाईम विथ फॅमिली” असे  कॅप्शन  देऊन पवार कुटुंबात सर्वकाही आलबेल असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.  

या फोटोमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासह पार्थ पवार आणि रोहित पवार एकत्र दिसत आहेत. मात्र नाराजीच्या चर्चांनंतर पवार कुटुंबीयात सर्व काही आलबेल असल्याचे या फोटोच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे की काय ? असा प्रश्न उभा राहिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष  शरद पवार यांनी पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी मिळावी, यासाठी माढ्यातून माघार घेतली. मात्र यानंतर रोहित पवार यांनी शरद पवारांना उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे भावनिक आवाहन केले होते. त्यामुळे पार्थ आणि रोहित पवार यांच्यात धुसफूस असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, रोहित पवार यांनीही या  चर्चा निराधार असल्याचे म्हटले होते.