पवार कुटुंबातील चारजण लोकसभेच्या रिंगणात? प्रतिष्ठा लागणार पणाला!  

0
2468

मुंबई, दि. १२ (पीसीबी) –  लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.  तर मतदारसंघनिहाय उमेदवारांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार जण निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याची शक्यता  आहे.  त्यामुळे पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. 

बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शिरुर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत.  शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत विचार करत आहेत, तर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून नशीब आजमावण्याची शक्यता आहे.

सुप्रिया सुळे या गेल्या वेळी लोकसभा निवडणुकांच्या मैदानात उतरणाऱ्या पवार कुटुंबातील एकमेव सदस्य होत्या. पवार कुटुंबीयांनी निवडणूक लढवली, तर केवळ त्या-त्या मतदारसंघातीलच नाही, तर राष्ट्रवादीच्या इतर जागा जिंकण्याची शक्यता वाढेल, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा कयास  आहे. तसेच राष्ट्रीय राजकारणातही राष्ट्रवादीचा दबदबा  राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.