Maharashtra

‘पवारांबद्दल खालच्या शब्दात बोलणं….’; निलेश लंकेंकडून पडळकरांचा खरपूस समाचार

By PCB Author

July 01, 2021

अहमदनगर, दि.०१ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला आहे. शरद पवार देशातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्यावर खालच्या शब्दात बोलणं शंभर टक्के चुकीचं असल्याचं सांगत अशी वक्तव्य इथून पुढे खपवून घेणार नाही, असा इशाराच पडळकरांना दिला आहे. गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर खालच्या शब्दात केली. ‘रात गेली हिबेशात, पोरगं नाही नशिबात’, अशा शब्दात त्यांनी पवारांवर हल्ला चढवला. पवारांच्या पंतप्रधानपदाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी एकामागोमाग एक शाब्दिक वार केले. तसंच सगळे जण पवारांना मोठा नेता मानत असतील पण मी मानायला तयार नाही, असंही पडळकर म्हणाले. पवारांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरल्याने राष्ट्रवादीचे नेते सध्या पडळकरांना तुटून पडले आहेत. अशातच लंकेंनी अशी वक्तव्य इथून पुढे खपवून घेतली जाणार नाही, असा उघड इशाराच पडळकरांना दिला आहे.

शरद पवार हे देशातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्यावर अशा शब्दात बोलणं शंभर टक्के चुकीचं आहे. महाराष्ट्राची भूमी ही महिलांचा मानसन्मान करणारी भूमी असून अश्याप्रकारे वक्तव्य करणं हे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. पडळकरांच्या वक्तव्याचा मी निषेध करत करतो. इथून पुढे बोलताना त्यांनी काळजी घ्यावी, अशी वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही, असं लंके यांनी म्हटलंय. “माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय. मुद्द्यांची बात करणारी राष्ट्रवादी गुद्द्यांवर आलीय. राष्ट्रवादीचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. बहुजनांवर अन्याय करणारे हे लोक आहेत. माझं शरद पवारांना आव्हान आहे की त्यांनी सांगावं, मुद्यावर बोलत असताना डोक्यात दगड घालायचं हे कोणत्या कलमात लिहलं आहे”, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी आज (गुरुवार) सोलापुरात बोलताना केली.